जळगाव -जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. शुक्रवारी एकाच दिवशी तब्बल 50 कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. जिल्हा प्रशासनाला दिवसभरात तीन टप्प्यात कोरोना चाचणीचे अहवाल प्राप्त झाले. त्यात पहिल्या टप्प्यात 24, दुसऱ्या टप्प्यात 5 आणि तिसऱ्या टप्प्यात 21 असे एकूण 50 पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 621 इतकी झाली आहे.
खासगी लॅबमध्ये तपासणी केलेल्या पाच व्यक्तींचे पॉझिटिव्ह अहवाल जिल्हा प्रशासनाला दुसऱ्या टप्प्यात प्राप्त झाले. पाॅझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये फैजपूर व भुसावळ येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा तर जळगाव शहरातील खोटेनगर, जुने जळगाव व मेहरूण रोड येथील तीन व्यक्तींचा समावेश आहे. दरम्यान, जिल्ह्यातील फैजपूर येथील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला देखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. खबरदारी म्हणून या पोलीस अधिकाऱ्याच्या संपर्कातील इतर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना वैद्यकीय तपासणीसाठी क्वारंटाईन केले जाणार आहे.
त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील आणखी 119 कोरोना संशयित व्यक्तींचे तपासणी अहवाल रात्री उशिरा प्राप्त झाले. त्यापैकी 98 अहवाल निगेटिव्ह तर 21 अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. पाॅझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये चाळीसगाव येथील 3, चोपडा 5, धरणगाव 2, वरणगाव 5, एरंडोल 3, भडगाव 1, निंभोरा, रावेर येथील 2 व्यक्तींचा समावेश आहे. सद्यस्थितीत जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 621 इतकी झाली आहे.