जळगाव - माणसाला आयुष्यात कोणत्या प्रसंगाला सामोरे जावे लागेल, हे कुणालाही सांगता येणार नाही. सध्या जगभर धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना संसर्गाची भीती आपल्यापर्यंत येऊन पोहचली आहे. त्यामुळे अत्यंत दुर्दैवी परिस्थितीला दोघा भावंडांना सामोरे जावे लागले. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभर लॉकडाऊन असल्याने दोघांना पित्याच्या अंत्यसंस्काराला जाता आले नाही. पित्याला अखेरचा खांदा तर नाहीच, पण त्यांचे अंत्यदर्शनही होऊ शकले नाही. जगन पितांबर मिस्तरी (वय 65) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
अमळनेर तालुक्यातील झाडी गावातील संतोष आणि सुखदेव मिस्तरी यांच्या बाबतीत हा दुर्दैवी प्रसंग घडला आहे. घरची परिस्थिती बेताची असल्याने दोघेही उदरनिर्वाहासाठी सुरतला राहतात. त्यांचे वडील जगन मिस्तरी (वय 65) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. मात्र, नेमक्या याच वेळी कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात लॉकडाऊन जाहीर केल्याने सार्वजनिक तसेच खासगी वाहतूक व्यवस्था ठप्प आहे. अशा परिस्थितीत वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी गावी येणे शक्य नव्हते. ही परिस्थिती लक्षात घेऊन गावातील संभाजी देवरे, सुकलाल देवरे, पोलीस पाटील प्रवीण धनगर यांनी पुढाकार घेत जगन मिस्तरी यांच्यावर मोजक्या ग्रामस्थांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला.