जळगाव -जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात यावर्षी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नगदी पीक समजल्या जाणाऱ्या बागायती कापसाला अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका बसला. पावसामुळे कापूस ओला झाल्याने त्याच्या प्रतवारीवर परिणाम झाला आहे. प्रतवारी घसरलेल्या कापसाला बाजारात कमी भाव मिळत आहे. खासगी व्यापारी कमी दरात कापूस खरेदी करीत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे शासनाने तातडीने कापूस खरेदी केंद्रे सुरू करावीत, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
जिल्ह्यात सुमारे साडेसात लाख हेक्टरवर खरीप हंगामाची पेरणी होते. यात सर्वाधिक पाच ते साडेपाच लाख हेक्टर क्षेत्र हे जिरायती तसेच बागायती कापसाचे असते. यावर्षी ज्वारी, बाजरी, मका, सोयाबीन, कापूस या पिकांना मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाचा फटका बसला. त्यामुळे शेतकरी अस्मानी संकटात सापडून हवालदिल झाला आहे. शेतीला लागलेला खर्चही निघालेला नाही. सुरुवातीला कडधान्य पिके शेतकऱ्यांच्या हातून निघून गेली. त्यानंतर शेतकऱ्यांची सर्व मदार नगदी पीक समजल्या जाणाऱ्या कापसावर अवलंबून होती. मात्र, अवकाळी पावसामुळे शेतातील कापूस खराब झाला आहे. खराब झालेला कापूस खासगी व्यापारी कवडीमोल दरात खरेदी करत आहेत. शासनाची कापूस खरेदी केंद्र अद्याप सुरू नसल्याने शेतकऱ्यांना नाईलाजाने मिळेल त्या दरात खासगी व्यापाऱ्यांना कापूस विकावा लागत आहे. सरकारने कापसाला ठोस हमीभाव जाहीर करून कापूस खरेदी केंद्र तत्काळ सुरू करावीत, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.
हेही वाचा -पोलीस आणि न्याय विभागात महाराष्ट्र चौथा; तुरुंग विभागात दुसऱ्या क्रमांकावर