जळगाव - जिल्ह्यातील पारोळा शहरातील मडक्या मारुती भागातील रहिवासी शेतकरी हिरामण बाबूराव बारी (वय ७०) यांनी कर्जामुळे विष पिऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी सायंकाळी समोर आली.
हिरामण बारी यांनी वंजारी खुर्द भागात असलेल्या शेतीत मका व गहू पेरणी केली होती. ते नेहमीप्रमाणे ७ तारखेला शेतात गेले होते. सायंकाळी उशिरापर्यंत ते घरी परतले नाहीत. त्यांचा लहान मुलगा देवीदास हा वडील शेतातून का आले नाहीत? म्हणून त्यांना पाहण्यासाठी शेतात गेला होता. त्याला वडील शेतातील घराच्या ओट्यावर पडलेले दिसले. त्यांच्या नाका तोंडातून फेस येत होता. वडिलांची अवस्था पाहून देवीदास घाबरला. त्याने वडिलांना रिक्षाने उपचारासाठी पारोळा कुटीर रुग्णालयात आणले. वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश साळुंखे यांनी शर्थीचे प्रयत्न केले. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.