जळगाव : हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेसंबंधी राज्य सरकारच्या हिश्श्याचा निधी अद्यापही प्राप्त झालेला नाही. यामुळे या योजनेत सहभागी झालेले किंवा परताव्यांसाठी पात्र सुमारे 42 हजार शेतकऱ्यांना परतावे उशिराने मिळतील, अशी स्थिती आहे. विमा योजनेच्या निकषानुसार विमा कालावधी संपल्यानंतर 45 दिवसांच्या आत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्यांचा परतावा मिळणे अपेक्षित आहे. परंतु, राज्य सरकारच्या उदासीनतेमुळे जिल्ह्यातील 42 हजार केळी उत्पादक शेतकरी अद्याप पीकविमा परताव्याच्या प्रतिक्षेत आहेत.
जिल्ह्यातील 42 हजार केळी उत्पादकांनी 2019-20 या आर्थिक वर्षात केळी पिकासाठी विमा योजनेचे संरक्षण घेतले होते. विमा हप्त्यापोटी विमा कंपनीकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा 36 कोटी रुपये निधी देण्यात आला होता. जिल्ह्यात मागील हंगामात म्हणजेच, विमा संरक्षण कालावधीत केळी पिकाला नैसर्गिक समस्यांचा मोठा फटका बसला. केळी उत्पादनात अग्रेसर असलेल्या रावेर, यावल, चोपडा, मुक्ताईनगर, जामनेर या भागात अधिकची थंडी, वादळ, उष्णतेमुळे केळी पिकाचे मोठे नुकसान झाले. निसर्ग चक्रीवादळामुळेही केळीच्या बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. एवढेच नाही तर कोरोनाच्या समस्येमुळे देशभरातील बाजारपेठेतून मागणी कमी झाली. केळीचे दर घसरले. अशा परिस्थितीत केळी उत्पादक मोठ्या संकटात सापडले आहेत.
केळी पिकासंबंधी विमा संरक्षण कालावधी नऊ महिन्यांचा होता. हा कालावधी जुलै 2020 मध्ये संपला आहे. हा कालावधी संपण्यापूर्वीच या योजनेसाठी देय परताव्यांसाठी सरकारकडून निधी उपलब्ध करून देणे अपेक्षित असते. विमा कालावधी संपताच 45 दिवसात पात्र शेतकऱ्यांना परतावे द्यायचे असतात. तसेच, 45 दिवसांपेक्षा अधिक कालावधी झाला तर सरकारला विमा परताव्याच्या रकमेवर 12 टक्के व्याज द्यावे लागते. केंद्राकडून त्यांच्या हिश्श्याचा निधी उपलब्ध आहे. मात्र, राज्य सरकारकडून निधी उपलब्ध झालेला नाही.
विमा परताव्यांपोटी जिल्ह्यात सुमारे पावणेतीनशे कोटी रुपये मिळणे अपेक्षित आहे. यातील निम्मा निधी केंद्र व निम्मा राज्य सरकारला द्यावा लागणार आहे. राज्य सरकारकडून निधी प्राप्त झाला असता तर परताव्यांचे वितरण याच महिन्यात सुरू झाले असते. गेल्यावर्षी 16 ऑगस्टपासून जिल्ह्यात विमा योजनेच्या लाभार्थी केळी उत्पादकांना परतावे मिळण्यास सुरुवात झाली होती. परंतु यंदा राज्य सरकारकडून निधीच प्राप्त झालेला नसल्याने परताव्यांना विलंब होईल, अशी स्थिती आहे.