जळगाव -जिल्ह्यात जून ते ऑक्टाेबर या कालावधीत अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिके, मनुष्यहानी, घरांची पडझड होऊन नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी जिल्ह्यातील शेतकरी व नागरिकांना मदत देण्यासाठी १८ कोटी १९ लाख १० हजार रुपयांचे अनुदान जिल्ह्याला प्राप्त झाले आहे. शेतकऱ्यांना ही मदत वितरित करण्यासाठी हा ५० टक्के निधी तालुक्यांना वितरित करण्यात आला आहे.
अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ६८ हजार ४२३ शेतकऱ्यांच्या ३६ हजार ३६० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी २६ कोटी ७२ लाख ४११ रुपये भरपाई मिळण्याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाला सादर करण्यात आला होता. जून ते ऑक्टोबर या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकांचे व बहुवार्षिक पिकांचे किमान ३३ टक्के नुकसान झाले आहे. अशा बाधित शेतकऱ्यांना शेती पिकांच्या जिरायत व आश्वासित सिंचनाखालील पिके नुकसानीसाठी १० हजार रुपये प्रतिहेक्टर व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी २५ हजार रुपये प्रतिहेक्टर या दराने २ हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्यात येणार आहे.
मनुष्यहानी, जखमी व नैसर्गिक आपत्तीमध्ये घरे पूर्णत: क्षतिग्रस्त झाली असल्यास कपडे, घरगुती भांडी, वस्तूंकरिता अर्थसहाय्यासाठी २८ लाख रुपये देण्यात येतील. मृत जनावरांसाठी ८.३८ लाख, पूर्णत: नष्ट, अंशत: पडझड झालेली कच्ची, पक्की घरे, नष्ट झालेल्या झोपड्या व गोठ्यांसाठी १०.६ लाख रुपये, शेतजमिनीच्या नुकसानीसाठी २८.६३ लाख, एडीआरएफच्या दराने ६ हजार ८०० रुपये प्रतिहेक्टर व बहुवार्षिक पिकांसाठी १८ हजार रुपये प्रतिहेक्टरप्रमाणे मदत देण्यात येणार आहे. मदत शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. नुकसानीसाठी वाटप करण्यात आलेल्या मदतीतून बँकांनी कोणत्याही प्रकारची वसुली करू नये, असे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहे.
तालुकानिहाय मिळालेले अनुदान -
जळगाव ३ कोटी ८१ लाख ३८ हजार ६०७, जामनेर १० लाख ३६ हजार ५९९, भुसावळ ४१ लाख ८७ हजार ४१९, बोदवड ७३ लाख २ हजार ७७०, मुक्ताईनगर ४१ लाख ३६ हजार ९४२, एरंडोल ३ कोटी २१ लाख २७ हजार ७२, धरणगाव २ कोटी १६ लाख ९८ हजार २४८, पारोळा २५ लाख ३९ हजार ८४६, यावल १ कोटी ११ लाख ९१ हजार ७३१, रावेर १ कोटी १३ लाख ३२ हजार ८५५, अमळनेर १ कोटी ८४ लाख ५० हजार ७७, चोपडा २ कोटी ९९ लाख ९१ हजार ५९३, पाचोरा ३१ लाख ४८ हजार ५६८, भडगाव २१ लाख ४४ हजार ७८७, चाळीसगाव ५ लाख ८२ हजार ८८४.