जळगाव -अतिवृष्टीमुळे यावर्षी चारावर्गीय पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पशुखाद्याचे दरही गगनाला भिडले आहेत. अशा परिस्थितीत पशुपालकांना आपली जनावरे सांभाळणे कठीण झाल्याचे चित्र जळगाव जिल्ह्यात निर्माण झाले आहे. दुभत्या जनावरांना पुरेसा चारा मिळत नसल्याने ग्रामीण भागातील दुग्ध व्यवसाय संकटात सापडला आहे.
जळगाव जिल्ह्यात चारा टंचाई
जळगाव जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकरी शेतीपूरक व्यवसाय म्हणून दुग्धव्यवसाय करतात. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांकडे बैलांसह गायी, म्हशी, शेळ्या अशी जनावरे आहेत. दुभत्या जनावरांना मोठ्या प्रमाणावर चारा लागतो. दरवर्षी पावसाळ्यात ज्वारी, बाजरी आणि मक्याचा चारा उपलब्ध होत असतो. हा चारा पशुपालकांना मार्च ते एप्रिल अखेरपर्यंत पुरतो. त्यानंतर उन्हाळ्यात मे ते जून या दोन ते अडीच महिन्यांच्या कालावधीसाठी चाऱ्याची टंचाई भासते. तेव्हा शेतकरी रब्बी हंगामातील मका आणि दादर(हिवाळ्यातील ज्वारी) पिकाचा चारा जनावरांना खाऊ घालतात. त्यानंतर पावसाळा सुरू झाल्यावर चाऱ्याची समस्या आपोआप मार्गी लागते.
हेही वाचा - ऐकावं ते नवलंच...स्मशानभूमीतून अस्थी गेल्या चोरीला!
मात्र, यावर्षी जानेवारी महिन्यातच चाऱ्याच्या समस्येने डोके वर काढले आहे. अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील चारावर्गीय पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे ज्वारी, बाजरी आणि मका पिकांपासून मिळणारा चारा सडून गेला. आता रब्बीत बहुसंख्य शेतकऱ्यांनी गहू, हरभरा पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली आहे. मका आणि हिवाळी ज्वारीची (दादरची) लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांना कमी प्रमाणात चारा उपलब्ध होणार आहे. उपलब्ध होणारा चाराही एप्रिल महिन्याच्यी अखेरीस हाती येईल. मात्र, जनावरांना आत्ता खाऊ घालण्यासाठी चारा नाही. त्यामुळे अनेकजण दुभती जनावरे विकणे पसंत करत आहेत.
पशुखाद्य झाले महाग-
खरीप हंगामात चारा उपलब्ध न झाल्याने शेतकऱ्यांसमोर आता पशुखाद्याचा पर्याय उपलब्ध आहे. मात्र, हा पर्याय खर्चिक असून तो शेतकऱ्यांना परवडणारा नाही. सरकी ढेप, सुग्रास कांडी तसेच दळलेला मका यांचे दर गगनाला भिडले आहेत. सरकी ढेपच्या एका पोत्याचा दर (60 किलो) 1 हजार 400 ते 1 हजार 600 रुपयांपर्यंत आहे. सुग्रास कांडीचे दरही जवळपास सरकी ढेप इतकेच आहेत. एवढे महाग पशुखाद्य विकत घेणे शेतकऱ्यांना परवडणारे नाही. 4 म्हशींना एका दिवसाला साधारणपणे 40 किलो ढेपची आवश्यकता असते. त्यांच्या दुधापासून मिळणारे उत्पन्न लक्षात घेतले तर पशुखाद्यावर होणारा खर्च आणि दुधाचे उत्पन्न याचा ताळमेळ बसत नाही.
दुधाची तहान ताकावर -
दुभत्या जनावरांना चारा मिळत नाही. त्यातच पशुखाद्यही महाग असल्याने अनेक पशुपालक शेतकरी जनावरांना चारा म्हणून कोवळा ऊस खाऊ घालत आहेत. सरकी ढेप, दळलेल्या मक्यापेक्षा कोवळा ऊस कमी दरात मिळत आहे. दोनशे ते अडीचशे रुपये प्रती शेकडा (उसाच्या 100 पेंड्या) दराने कोवळा ऊस मिळत आहे. यावर्षी पावसाळा चांगला झाल्याने मोठ्या प्रमाणावर ऊस उपलब्ध आहे. म्हणून अनेक पशुपालक 'दुधाची तहान ताकावर' या म्हणीप्रमाणे वेळ मारून नेत आहेत.