जळगाव- चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखान्याकडे अनेक शेतकऱ्यांचे उसाचे पेमेंट थकीत आहे. हे थकीत पेमेंट तत्काळ अदा करावे, या मागणीसाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रविवारी सकाळी साखर कारखान्याचे संचालक तथा विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्या घरासमोर घंटानाद आंदोलन केले. दरम्यान, पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांना अटक करून सुटका केली.
जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात असलेल्या चहार्डी गावात चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखाना आहे. सध्या या साखर कारखान्याची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने अनेक शेतकऱ्यांचे उसाचे पेमेंट थकले आहे. वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही थकीत पेमेंट मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. शेतकऱ्यांना त्यांचे थकीत पेमेंट तत्काळ देण्यात यावे, या मागणीसाठी रविवारी सकाळी शिवसेनेच्यावतीने साखर कारखान्याचे संचालक तथा विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्या घरासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. आंदोलनाची पूर्वकल्पना असल्याने पोलिसांनी अवघ्या ५ मिनिटात आंदोलकांना अटक केली. आंदोलन मागे घेतल्यानंतर काही वेळाने आंदोलकांची सुटका करण्यात आली.