जळगाव -शासन दरबारी आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी सरकारी अधिकारी व कर्मचारी संप करत असल्याचे आजवर आपण पाहिले आहे. शेतमालाचे भाव वाढवावेत म्हणून शेतकरी संपावर गेल्याचेही उदाहरण आहे. पण कधी शेतमजूर संपावर गेल्याचे ऐकिवात नाही. जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील मनवेल-दगडी या गावात मात्र, असंच काहीसं घडले आहे. महागाई गगनाला भिडली आहे. सर्वच बाबींचे दर वाढलेत. महागाईमुळे उदरनिर्वाह करणे जिकिरीचे झाल्याने आमची मजुरी वाढवावी, या मागणीसाठी येथील शेकडो शेतमजूर महिलांनी संपाचे हत्यार उपसले आहे.
यावल तालुक्यातील मनवेल-दगडी हे सुमारे तीन हजार लोकसंख्येचे गाव. शेती हा येथील गावकऱ्यांचा प्रमुख व्यवसाय. दुसरीकडे, गावातील सुमारे दीडशे ते दोनशे कुटुंबांचा उदरनिर्वाह हा शेतमजुरीवर चालतो. शेतमजुरी करणाऱ्या महिलांना गेल्या काही वर्षांपासून एका दिवसासाठी 100 रुपये रोजंदारी म्हणून मिळतात. परंतु, आता महागाई गगनाला भिडली आहे. उदरनिर्वाहासाठी लागणाऱ्या सर्वच वस्तुंचे दर आवाक्याबाहेर गेले आहेत. अशा परिस्थितीत दिवसभर शेतात राबून हाती येणारे 100 रुपये कमी पडतात. एवढ्या रकमेत संसाराचा रहाटगाडा कसा हाकायचा, मुलांचे शिक्षण, दवाखाना असा खर्च कसा करायचा, या विवंचनेत शेतमजूर महिला सापडल्या आहेत. वाढती महागाई लक्षात घेऊन मजुरी 100 रुपयांऐवजी 150 रुपये करावी, अशी मागणी गावातील शेतमजूर महिलांनी केली आहे. पण शेतकरीवर्गाने त्याला प्रतिसाद न दिल्याने शेतमजूर महिलांनी थेट संप पुकारला असून, कामावर बहिष्कार टाकला आहे.
गेल्या 5 दिवसांपासून प्रश्नावर तोडगा नाही-
गावातील शेतमजूर महिलांनी मजुरी वाढवण्याच्या मागणीसाठी संप पुकारला आहे. शेतकरी आणि मजूर महिला यांच्यात एकमत होत नसल्याने गेल्या 5 दिवसांपासून हा प्रश्न रेंगाळला आहे. खते व बियाण्यांचे वाढते दर, नैसर्गिक संकटे अशा कारणांमुळे शेती परवडत नाही. त्यात मजुरीचा वाढीव भार कसा पेलायचा? अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. मजुरांशिवाय शेती करणे अशक्य असल्याने काही शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन दीडशे ऐवजी सव्वाशे रुपये मजुरी देण्यास सहमती दर्शवली. पण मजूर महिला दिडशेच्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे अद्यापही या विषयावर तोडगा निघालेला नाही.
मजूर महिला धडकल्या ग्रामपंचायतीवर -