जळगाव - गेल्या काही दिवसापासून संततधार पाऊस सुरू असल्यामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्याने नैराश्य आलेल्या एका शेतकऱ्याने आपली जीवनयात्रा संपवली. ही धक्कादायक घटना जळगाव जिल्ह्यातील भादली येथे घडली. प्रभाकर पांडुरंग कोळी (वय ५७, रा. भादली, ता. जळगाव) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे नुकसान; शेतकऱ्याची आत्महत्या - जळगाव पाऊस बातमी
जळगाव जिल्ह्यात मागील काही दिवसात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. तशातच शेतकऱ्यांनी खरीप पिकांसाठी खासगी सावकारांकडून कर्ज घेतले होते. हे कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून भादली येथील शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
भादली शिवारात कोळी यांचे शेत आहे. त्यांनी शेतात उडीद व कापसाची लागवड केली होती. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले. नुकसान झाल्याचे काही दिवसांपासून प्रभाकर कोळी चिंतेत होते. पत्नी, मोठा मुलगा आणि सुन शेतात गेले तर लहान मुलगा अमोल हा दुकानावर कामाला गेला. घरी कोणीही नसताना दुपारी राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन प्रभाकर कोळी यांनी आत्महत्या केली. पत्नी व मुलगा घरी आल्यावर घराचा दरवाजा आतून बंद होता. त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले असता त्यांनी गळफास घेतल्याचे लक्षात आले.
प्रभाकर यांनी खरीप पेरणीसाठी सोसायटी तसेच सावकाराकडून कर्ज घेतलेले होते. या कर्जाची परतफेड आलेल्या उत्पन्नातून करणार होते. मात्र, हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने सावकाराकडून घेतलेले कर्ज कसे फेडायचे असा प्रश्न प्रभाकर यांच्या समोर होता. त्यातूनच नैराश्य आल्याने त्यांनी आत्महत्या केली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.