जळगाव -जिल्ह्यात मान्सूनच्या दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. जून महिना संपायला अवघे ५ दिवस शिल्लक असतानाही पावसाचे आगमन झालेले नाही. त्यामुळे खरीप हंगामातील पेरणी रखडली आहे. यावर्षी संपूर्ण मृग नक्षत्र कोरडे गेल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. जून अखेरपर्यंत जिल्ह्यात फक्त १५ ते १७ टक्के पेरण्या झाल्या आहेत. त्यातही पूर्वहंगामी कापसाची लागवड अधिक आहे. जिल्ह्यातील बहुसंख्य तालुक्यात तर दुबार पेरणी करावी लागणार आहे, अशी स्थिती आहे.
जळगाव जिल्ह्यात दरवर्षी साधारणपणे जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मान्सून दाखल होतो. परंतु, यावर्षी जून संपायला आला तरी पाऊस झालेला नाही. काही तालुक्यांमध्ये तुरळक स्वरूपाचा पाऊस झाला होता. पण आजमितीस संपूर्ण जिल्ह्यात पावसाने दडी मारली असून, खरिपाच्या पेरणीसाठी बळीराजाला दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. पेरणीसाठी हवा तसा पाऊस झाला नसल्याने जिल्ह्यातील पेरण्या खोळंबल्या आहेत.
गेल्या वर्षी जूनमध्ये झाल्या होत्या ४० टक्के पेरण्या -
गेल्या वर्षी जून महिन्याच्या सुरुवातीला निसर्ग चक्रीवादळ आले होते. त्यामुळे किनारपट्टी भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन महाराष्ट्रात मान्सून लवकर दाखल झाला होता. मान्सूनचे आगमन लवकर झाल्यामुळे जळगाव जिल्ह्यात जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच सुमारे ३५ ते ४० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. परंतु, यावर्षी मान्सून लांबणीवर पडला आहे. त्यामुळे खरिपाच्या पेरण्या रखडल्या आहेत. जून महिन्याच्या प्रारंभी झालेल्या तुरळक पावसामुळे जिल्ह्यातील काही तालुक्यात शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. कृषी विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात आतापर्यंत अवघ्या १५ ते १७ टक्के पेरण्या झाल्या आहेत. पाऊस लांबला तर परिस्थिती अजून गंभीर होण्याची भीती आहे. जिल्ह्यात पूर्वहंगामी कापसाची लागवड वगळली तर फक्त ५ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. उडीद, मूग, सोयाबीनची पेरणी झालेली नाही, अशी माहिती कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांनी दिली.
हेही वाचा -जळगाव : कोरोनाच्या 'डेल्टा प्लस व्हेरियंट'चे संकट; जिल्ह्यात पुन्हा निर्बंध