जळगाव- जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून जळगाव जिल्ह्यात चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे खरीप हंगामाच्या पेरण्या अंतिम टप्प्यात आल्या आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ९० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. यावर्षी पाऊस उशिराने दाखल झाल्याने ज्वारीचे क्षेत्र गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढले. तर पूर्वहंगामी कापसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर घटले आहे.
माहिती देताना जिल्हा कृषी अधिकारी
जळगाव जिल्ह्यात यावर्षी २२ जूननंतर पावसाला सुरुवात झाली. काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरूच आहे. जिल्ह्यात सर्वदूर पेरणीयोग्य पाऊस झाल्याने खरीप हंगामाच्या पेरण्यांना वेग आला. गेल्या १० दिवसात संपूर्ण जिल्ह्यातील ९० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. ६ जुलैपर्यंत झालेल्या पावसाची सरासरी विचारात घेतली, तर गेल्या वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत ६७ टक्के पाऊस झाला आहे. उशिराने का होईना, पण पेरणीयोग्य पाऊस पडल्याने शेतकरीवर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे. आता यापुढेही असाच चांगला पाऊस पडेल, अशी शेतकऱ्यांना आशा आहे.
गेल्या वर्षी पावसाळ्यात शेवटचे दोन महिने जळगाव जिल्ह्यात पावसाने ओढ दिली होती. त्यामुळे भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. त्यातच यावर्षी पाऊस उशिराने दाखल झाला. या कारणामुळे पूर्वहंगामी कापसाच्या लागवडीवर मोठा परिणाम झाला. पूर्वहंगामी कापसाचे क्षेत्र यावेळी तब्बल ६० टक्क्यांनी घटले असून ते केवळ १४ ते १५ हजार हेक्टर एवढे आहे. खरिपात होणाऱ्या हंगामी कापूस लागवडीवर मात्र कोणताही परिणाम झालेला नाही. हंगामी कापूस लागवड अपेक्षेप्रमाणे साडेचार लाख हेक्टरवर झाली आहे. जिल्ह्याच्या एकूण साडेसात लाख हेक्टर लागवडीखालील क्षेत्रापैकी सर्वाधिक क्षेत्र हे हंगामी कापसाचेच आहे. उडीद, मूग या कडधान्य पिकांचे क्षेत्रही नेहमीप्रमाणे आहे.
यावर्षी ज्वारीचे क्षेत्र वाढले आहे. तर मक्याचे क्षेत्र घटले आहे. गेल्यावर्षी मक्यावर रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. त्याचप्रमाणे यावर्षी मक्यावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव होण्याची भीती असल्याने शेतकऱ्यांनी सावध पवित्रा घेत मक्याऐवजी ज्वारीच्या पेरणीला पसंती दिली. त्याचप्रमाणे तेलवर्गीय पिकांमध्ये सोयाबीनचे क्षेत्रही ७० टक्क्यांनी घटले आहे. अनेक शेतकऱ्यांनी मका, सोयाबीन ऐवजी ज्वारी पेरली आहे. त्यामुळे जिल्ह्यात हंगामी कापसानंतर ज्वारीचे क्षेत्र सर्वाधिक आहे.
पेरणीनंतर चांगला पाऊस झाल्यामुळे सर्वच पिकांचा उतारा चांगला झाला आहे. पूर्वहंगामी कापसाचे पीक तजेलदार दिसत आहे. तर ज्वारी, बाजरी तसेच कडधान्ये पिकेही शेतांमध्ये चांगली उतरली आहेत. ज्या भागात वाफसा आहे, त्याठिकाणी पिकांची निंदणी, कोळपणी, वखरणी अशी आंतरमशागतीची कामे सुरू आहेत. तर पूर्वहंगामी कापसाला रासायनिक खतांची मात्रा देण्याची कामे सुरू आहेत.