महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या; जळगावच्या भोकर येथील घटना - फुलचंद सोनवणे भोकर

सततच्या नापिकीमुळे आलेल्या कर्जबाजारीपणाला कंटाळून जळगाव तालुक्यातील भोकर येथील एका वृद्ध शेतकऱ्याने तापी नदीपात्रात उडी घेवून आत्महत्या केली. फुलचंद ताराचंद सोनवणे (वय ६९) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

By

Published : Aug 16, 2019, 6:28 PM IST

जळगाव -सततच्या नापिकीमुळे आलेल्या कर्जबाजारीपणाला कंटाळून जळगाव तालुक्यातील भोकर येथील एका वृद्ध शेतकऱ्याने तापी नदीपात्रात उडी घेवून आत्महत्या केली. फुलचंद ताराचंद सोनवणे (वय ६९) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

जळगाव तालुक्यातील भोकर येथे फुलचंद सोनवणे हे पत्नी व आईसह राहत होते. त्यांना दोन मुले असून दोघेही नाशिक येथे एका कंपनीत काम करतात. फुलचंद यांची गावातच ६ एकर शेती आहे. सततच्या नापिकीमुळे त्यांच्यावर विकास सोसायटीचे साडेतीन लाख रुपयांचे कर्ज होते. या वर्षी अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्याने डोक्यावर असलेले कर्ज कसे फेडायचे, या विचाराने गेल्या काही दिवसांपासून ते मानसिक तणावात होते. गुरुवारी त्यांची पत्नी नाशिक येथे मुलांकडे गेली होती. गुरुवारी मध्यरात्री ते आई भिकूबाई यांना शौचास जावून येतो, असे सांगून घराबाहेर पडले होते.

बराच वेळ होऊनही फुलचंद घरी परत न आल्याने त्यांच्या आईने शेजारच्या लोकांना याबाबत कल्पना दिली. त्यानंतर त्यांचा शोध घेण्यास सुरुवात झाली. रात्रभर शोध घेतल्यानंतर शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजता फुलचंद यांचा मृतदेह तापी नदीत तरंगताना आढळून आला. ग्रामस्थांनी फुलचंद यांचा मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढला. जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. फुलचंद सोनवणे यांच्या पश्चात आई, पत्नी, २ मुले आणि भाऊ असा परिवार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details