जळगाव- सततची नापिकी तसेच ओल्या दुष्काळामुळे डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढल्याने विवंचनेत असलेल्या एका शेतकऱ्याने आपली जीवनयात्रा संपवली. ही हृदयद्रावक घटना जळगाव तालुक्यातील सावखेडा खुर्द येथे घडली आहे. विजय रमेश सपकाळे (वय ३२) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या शेतकऱ्यावर सुमारे दोन लाख रुपयांचे कर्ज होते.
विजय सपकाळे यांच्याकडे अवघी दोन एकर शेतजमीन होती. यंदा त्यांनी शेतात कापूस लागवड केली होती. परंतु, ओल्या दुष्काळामुळे त्यांच्या हाती काहीच उत्पन्न आले नाही. शिवाय लागवडीसाठी घेतलेले कर्ज देखील ते फेडू शकणार नव्हते. गतवर्षी कमी पाऊस झाल्यामुळे देखील उत्पन्न आले नव्हते. सततच्या नापिकीमुळे त्यांच्यावर कर्ज वाढले होते. अखेर सपकाळे यांनी राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
शेजारच्या खोलीत झोपलेले त्यांचे वडील रमेश धनसिंग सपकाळे यांना पहाटे २.३० वाजता जाग आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. कुटुंबीय तसेच गावकऱ्यांनी पहाटेच त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.