जळगाव- गुजरातमधील भावनगर जिल्ह्यातून चाळीसगाव येथे आणलेल्या बनावट खतांचा साठा कृषी विभागाने छापा टाकून जप्त केला आहे. नाशिक, जळगाव व चाळीसगाव कृषी विभागाच्या पथकांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली. चाळीसगाव शहरातील घाट रोडवरील गोडाऊनमध्ये टाकलेल्या छाप्यात सुमारे २५ मेट्रीक टन वजनाचे ५ लाख २५ हजार रूपये किंमतीचे ५०० बॅग, १८-१८-१० हे बनावट रासायनिक खत पकडले आहे.
अनधिकृत रासायनिक खत चाळीसगाव येथे साठवणुकीसाठी येत असल्याची माहिती जळगाव जिल्हा गुणवत्ता नियंत्रक अरुण तायडे यांना मिळाली होती. त्यांनी ही माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर व कृषी विभागाचे नाशिक विभागाचे गुणवत्ता नियंत्रक उल्हास ठाकूर यांना दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली छापा टाकण्याचे नियोजन केले. जळगाव येथून चाळीसगाव येथे आल्यानंतर चाळीसगाव तालुका कृषी अधिकारी सी. डी. साठे, पंचायत समितीचे कृषी अधिकारी एस. एम. भालेराव, कृषी सहाय्यक अविनाश चंदिले, कृषी विभागाचे संजय चव्हाण व चंद्रशेखर वाणी यांच्या पथकाने गोडाऊनमध्ये छापा टाकला.
तेव्हा तिथे (एमएच १८ एए ७३२४) या ट्रकमधून रासायनिक खतांच्या गोण्या बेकायदेशीरित्या उतरवल्या जात असल्याचे पथकाला आढळून आले. पथकाने हा साठा तपासला असता सुमारे ५ लाख २५ हजार रूपये किंमतीच्या २५ मेट्रीक टन असलेल्या १८.१८.१० खताच्या ५०० बॅगा मिळून आल्या.
पथकाने या रासायनिक खतांची तपासणी केली असता बॅगांवर कोयना दाणेदार मिश्र खते कारखाना मलकापूर ता. कराड जि. सातारा असा मजकूर छापलेला आहे. ट्रकच्या चालकांनी हा साठा गुजरातमधील कंपनीतून भरून आणली असल्याची माहिती दिली. खतांचे बिल तपासले असता त्यातही तफावत आढळून आली. गोदाम मालक भिकन अर्जुन पाटील व रमेश पाटील यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी त्यांचे गाेदाम चाळीसगाव येथील महावीर कृषी केंद्राचे मालक शैलेश साखरचंद छाजेड यांना भाडे तत्वावर दिले असल्याचे सांगितले.
ट्रकसह खतांचा साठा जप्त-
कृषी विभागाने खतांचा साठा पंचनामा करून ट्रकसह तो ताब्यात घेतला असून तपासणीसाठी त्याचे नमुने पाठविले आहेत. तसेच ट्रकच्या दोघा चालकांनाही ताब्यात घेतले आहे. कृषी विभागाने जप्त केलेले १८.१८.१० हे खत प्रामुख्याने कपाशी, केळी, ऊस या पिकांसाठी शेतकरी मोठ्या प्रमाणावर वापरतात.