जळगाव -मान्सून चांगला राहिल्याने यावर्षी देशभरात कापसाचे उत्पादन गेल्या वर्षीप्रमाणे सरासरी इतके म्हणजेच, साडेतीन ते पावणे चार कोटी गाठींपर्यंत (1 गाठ, 178 किलो रुई) राहिले आहे. चालू हंगामात उत्पादित झालेल्या कापसापैकी आतापर्यंत सुमारे 30 लाख गाठींची भारताने विदेशात निर्यात केली आहे. कापसाचा हंगाम मार्च अखेरपर्यंत संपुष्टात येण्याची शक्यता आहे. तोपर्यंत संपूर्ण भारतातून 60 ते 65 लाख गाठींची निर्यात होईल. त्यामुळे यावर्षी कापसाच्या निर्यातीचे उद्दिष्ट पूर्ण होईल, असा विश्वास खान्देश जिनिंग व प्रेसिंग असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप जैन यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
देशात महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, कर्नाटक तसेच मध्यप्रदेशातील काही भागात कापसाचे विक्रमी उत्पादन घेतले जाते. कापसाच्या एकूण उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक राहतो. कारण प्रमुख 'नगदी पीक' म्हणून महाराष्ट्रातील शेतकरी कापसाला प्राधान्य देतात. पूर्वहंगामी आणि हंगामी अशा प्रकारे याठिकाणी कापसाचे उत्पादन घेतले जाते. यावर्षी देशभरात सुमारे साडेतीन ते पावणे चार कोटी गाठींपर्यंत कापसाचे उत्पादन झाले आहे. उत्पादित कापसावर जिनिंग व प्रेसिंगची प्रक्रिया पूर्ण होऊन जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत भारतातून सुमारे 30 लाख गाठींची निर्यात झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी जानेवारी अखेरपर्यंत झालेल्या कापूस निर्यातीची टक्केवारी 5 ते 10 टक्क्यांनी घटली आहे. असे असले तरी कापसाचा हंगाम आटोपण्याच्या वेळेपर्यंत (मार्च अखेरीस) भारत यावर्षीच्या निर्यातीचे उद्दिष्ट साध्य करेल, असा अंदाज आहे.
आतापर्यंतच्या निर्यातीत बांगलादेशचा वाटा सर्वाधिक-
आतापर्यंत भारतातून सुमारे 30 लाख गाठींची निर्यात झाली आहे. त्यात सर्वाधिक 12 ते 14 लाख गाठींच्या निर्यातीचा वाटा हा एकट्या प्रमुख खरेदीदार असलेल्या बांगलादेशचा राहिला आहे. यावर्षी संपूर्ण हंगामात भारतातून बांगलादेशात सुमारे 25 ते 28 लाख गाठींची निर्यात होण्याची शक्यता आहे. भारताचा कापूस दर्जाने उत्तम, परवडणारा वाहतूक खर्च आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय कापसाचा दर हा कमी असल्याने बांगलादेश प्रमुख खरेदीदार म्हणून पुढे आला आहे. पुढील दोन महिन्यात बांगलादेशात अजून 14 ते 15 लाख गाठींची निर्यात होऊ शकते, असेही प्रदीप जैन म्हणाले.
डॉलर वधारल्याने निर्यातीवर काहीअंशी परिणाम-
सध्या महिनाभरापासून अमेरिकन डॉलरचा दर वधारला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील सर्वच व्यवहारांवर परिणाम झाला आहे. कापूस निर्यातीला देखील फटका बसला आहे. डिसेंबर महिन्याच्या तुलनेत जानेवारी महिन्यात कापसाच्या निर्यातीला वेग मिळण्याची अपेक्षा होती. परंतु, अमेरिकन डॉलरचे दर सातत्याने वरच्या पातळीवर राहिल्याने कापसाची निर्यात मंदावली आहे. सध्या मोजक्या मल्टिनॅशनल कंपन्या आणि कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (सीसीआय) कडूनच निर्यात सुरू आहे.