जळगाव- जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत याहे. त्यावर तातडीने उपाय करण्यासाठी जिल्ह्यातील जळगाव, पाचोरा, भुसावळ, अमळनेर व चोपडा या तालुक्यातील जीवनावश्यक वस्तुंची दुकाने वगळता इतर व्यवहार लॉकडाऊन संपेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. याबाबतचे आदेश आज जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी काढले आहेत.
जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता त्यावर आवश्यक उपाययोजना करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीस पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांच्यासह नोडल अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे पुढे म्हणाले की, जिल्ह्याच्या काही भागात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहे. त्यावर तातडीने नियंत्रण मिळविण्यासाठी बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचे स्क्रिनींग वाढविण्यात आले आहे. यासाठी जिल्ह्यातील कोविड केअर सेंटरमध्येही संशयित रुग्णांचे स्वॅब घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आज जरी रुग्ण वाढत असले तरी भविष्यातील धोका यामुळे कमी होणार आहे. बाधित रुग्ण लवकरात लवकर शोधून त्यांच्यावर आवश्यक ते उपचार झाल्याने त्यांच्यापासून होणारा संसर्ग रोखण्यास मदत होणार आहे, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.
कंटेंनमेंट क्षेत्रात प्रतिबंध कायम-
जिल्ह्यातील कंटन्मेंट क्षेत्रातील कोणाही व्यक्तीला त्या क्षेत्राबाहेर जाता अथवा येता येणार नाही. या क्षेत्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी नियंत्रण अधिकाऱ्यांच्या नेमणुका कराव्यात तसेच या भागातील नियंत्रणासाठी स्थानिकांची मदत घ्यावी. कंटेन्मेंट क्षेत्रातील कोणीही व्यक्ती लॉकडाऊन संपेपर्यंत कुठल्याही सार्वजनिक आस्थापनेत कामावर येणार नाही याची खबरदारी संबंधित आस्थापनांनी घ्यावी. या क्षेत्रातील ज्या नागरिकांना उच्च रक्तदाब, डायबेटिस व इतर आजार असतील व त्यांना तातडीने उपचार, औषधे घेणे, तपासणी करणे आवश्यक असेल तर अशा नागरिकांसाठी नियंत्रण अधिकारी सुचनेनुसार वाहन व्यवस्था करतील. तसेच कोविड केअर सेंटरवर नियंत्रण ठेवण्यासाठीही अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात येणार आहेत.
अन्यथा दुकानाचा परवाना निलंबित होणार-
लॉकडाऊनच्या काळात सोशल डिस्टन्सिंगचे पालन होण्यासाठी जीवनावश्यक वस्तुंच्या दुकानात काऊंटरवर एकावेळी एकच व्यक्ती असावा. ज्या दुकानात या नियमांचे पालन होणार नाही, त्यांच्या दुकानाचा परवाना लॉकडाऊन संपेपर्यंत निलंबित करण्याचा इशाराही जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी यावेळी दिला.