महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगावातील मनसेच्या माजी पदाधिकाऱ्याच्या खुनाचा उलगडा

शहरातील मनसेचे माजी पदाधिकारी घन:श्याम शांताराम दीक्षित यांच्या खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. उसनवार दिलेल्या पैशांच्या कारणावरून झालेला वाद टोकाला गेल्याने दोघांनी दीक्षित यांचा दगडाने ठेचून निर्घृणपणे खून केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

घन:श्याम दीक्षित

By

Published : Aug 26, 2019, 12:18 AM IST

जळगाव- शहरातील मनसेचे माजी पदाधिकारी घन:श्याम शांताराम दीक्षित यांच्या खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. उसनवार दिलेल्या पैशांच्या कारणावरून झालेला वाद टोकाला गेल्याने दोघांनी दीक्षित यांचा दगडाने ठेचून निर्घृणपणे खून केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

घन:श्याम दीक्षित यांच्या खूनप्रकरणी जळगावातील औद्योगिक वसाहत पोलिसांनी सनी उर्फ चालीस वसंत पाटील (रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) व मोहिनीराज उर्फ मुन्ना अशोक कोळी (रा. सबजेलच्या मागे, जळगाव) या दोघांना अटक केली आहे. ही घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी लागलीच तपास चक्रे फिरवली. परिस्थितीजन्य पुराव्यांवरून घटनेचा काही तासातच उलगडा करत संशयितांना अटक केली.

मनसेच्या माजी पदाधिकाऱ्याच्या खुनाचा उलगडा

काय आहे नेमकं प्रकरण?

अटकेतील मोहिनीराज व सनी यांनी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा महिन्यांपूर्वी मुन्ना याने दीक्षित यांना ३५ हजार रुपये उसनवार दिले होते. यातील २५ हजार रुपये त्यांनी परत केले होते. तर १० हजार रुपये द्यायचे बाकी होते. शनिवारी रात्री दीक्षित हे त्यांच्या सुधीर महाले नामक मित्रासह बसस्थानक परिसरातील एका बियर बारमध्ये दारू पित बसले होते. यावेळी मुन्ना देखील त्याच ठिकाणी दारू पिण्यासाठी त्याच्या मित्रांसोबत आलेला होता. यावेळी मुन्ना याने मागील उधारीचे १० हजार रुपये मागून दीक्षित यांच्यासोबत वाद घातला. हा वाद मिटला होता. परंतु, मुन्नाच्या डोक्यात राग कायम असल्याने त्याने बदला घेण्याच्या उद्देशाने सनी पाटीलला सोबत घेऊन रात्री एक ते दीड वाजेच्या सुमारास दीक्षित यांचे घर गाठले. दीक्षित यांना घराबाहेर बोलावून साईबाबा मंदिराच्या प्रांगणात आणले. तेथे त्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर डोक्यात दगड घालून त्यांचा निर्घृणपणे खून केला. त्यानंतर दोघेही दुचाकीवरून पसार झाले होते. पोलिसांनी दोघांना जामनेर तालुक्यातील पहूर येथून अटक केली.

संशयितांकडून दिशाभूल?

अटकेतील दोघे संशयित खोटी माहिती देऊन दिशाभूल करत असल्याचा पोलिसांना संशय आहे. उसनवारीच्या पैशांच्या कारणावरून वाद झाल्याने दीक्षित यांचा खून केल्याचे संशयित सांगत आहेत. मात्र, या कारणाव्यतिरिक्त अन्य कारण या घटनेमागे असू शकते, असा पोलिसांचा कयास आहे. त्या दृष्टीने पोलीस तपास करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details