जळगाव -भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेले माजीमंत्री एकनाथ खडसे हे लागलीच 'अॅक्शन मोड'मध्ये आल्याचे पाहायला मिळत आहेत. सोमवारी (दि. 26 ऑक्टोबर) दुपारी खडसे मुक्ताईनगर येथून जळगावात त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले. यावेळी नंदुरबार जिल्ह्यातील तळोद्याचे माजी आमदार उदेसिंग पाडवी यांनी नंदुरबार जिल्ह्यातील काही कार्यकर्त्यांसोबत खडसेंची भेट घेतली. या भेटीत खडसे आणि पाडवी यांच्यात बंदद्वार भेटीत नंदुरबार जिल्ह्यातील राजकीय भूकंपाच्या विषयावर खलबते झाली. नंदुरबार जिल्ह्यातील काही पालिकांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने देखील या भेटीत व्यूव्हरचनेची आखणी झाल्याची माहिती मिळाली.
उत्तर महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते म्हणून परिचित असलेले एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत दाखल झाल्यानंतर जळगाव जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असल्याचे पाहायला मिळत आहे. खडसे सोमवारी जळगावात दाखल झाल्यानंतर तळोद्याचे माजी आमदार उदेसिंग पाडवी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे, उपाध्यक्ष शांतीलाल साळी, शहादा शहरप्रमुख सुरेंद्र कुंवर, शहाद्याचे नगरसेवक इकबाल शेख, चंद्रकांत पाटील, बी. के. पाडवी, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे राजेंद्र वाघ, राजरत्न बिरारे, रोहित ढोडरे आदींच्या शिष्टमंडळाने खडसेंची भेट घेतली.
राजकीय चर्चेच्या अनुषंगाने ही भेट बंदद्वार झाली. सुमारे अर्धा तास चाललेल्या या बैठकीत नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तसेच शहादा नगरपालिकांच्या निवडणुकीच्या बाबतीत प्राथमिक चर्चा झाली. त्याचप्रमाणे खडसे राष्ट्रवादीत दाखल झाल्याने त्यांच्यासोबत भाजप तसेच इतर पक्ष सोडून राष्ट्रवादीत येण्यास इच्छुक असलेल्या बड्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांच्या नावांवर चर्चा झाली.
लवकरच नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादीमय होणार