जळगाव -'कोरोनाचा दुसरा स्ट्रेन घातक आहे. त्यामुळे रुग्णसंख्या आणि मृत्यूचे प्रमाण सातत्याने वाढत आहे', अशा स्वरुपाच्या नकारात्मक बातम्या दररोज आपल्यापर्यंत येत आहेत. मात्र, रुग्णाने सकारात्मक मानसिकता ठेवली आणि जोडीला योग्य उपचाराची साथ असेल तर कोरोनातून पूर्णपणे बरं होता येते, हे एका रणरागिणीने सिद्ध केले आहे. विशेष म्हणजे, कोरोना झाल्यावर तिच्या शरीरातील ऑक्सिजन पातळी अवघी 57 इतकी होती. तिने जेवणही सोडले होते. मात्र, 39 दिवसांनंतर ती मृत्यूशय्येवरून परत आली. डॉक्टरांनी केलेले अथक प्रयत्न कामी आले.
शरीरातील ऑक्सिजन पातळी फक्त 57, तरीही 'ती'ने कोरोनाला हरवले - भारती शिंपी यांच्या बद्दल बातमी
शरीरातील ऑक्सिजन पातळी फक्त 57 असतानाही यांनी कोरोनावर मात केली. यासाठी प्रयत्न करणाऱ्या डॉक्टरांचा ग्रामस्थांनी सत्कार केला.
भारती भगवान शिंपी असे कोरोनातून बरे झालेल्या महिलेचे नाव आहे. ती जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील कावपिंप्री गावातील रहिवासी आहे. साधारणत: सव्वा महिन्यांपूर्वी भारती यांच्यासह त्यांचे पती भगवान आणि मुलगा यांना सोबतच कोरोनाची लागण झाली होती. काही दिवस उपचार घेतल्यानंतर भगवान शिंपी व मुलगा कोरोनातून बरे झाले. मात्र, भारती यांची प्रकृती अजून बिघडली. म्हणून त्याना खासगी रुग्णालयात उपचार देण्यात येत होते. घरची परस्थिती बेताची असल्याने खर्च परवडणारा नव्हता. यामुळे पंचायत समितीचे माजी सभापती श्याम अहिरे, सामाजिक कार्यकर्ते दिनेश पाटील यांच्या प्रयत्नांतून त्यांना 7 एप्रिलला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी त्यांच्या शरीरातील ऑक्सिजन पातळी 57 इतकी होती. बायपॅप लावून देखील त्या प्रतिसाद देत नव्हत्या.
डॉक्टरांनी प्रयत्न सोडले नाहीत -
भारती यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांच्या शरीरातील ऑक्सिजन पातळी खूपच कमी होती. अशातच त्यांनी जेवणही सोडले होते. हालचाल थांबली होती. मात्र, आम्ही प्रयत्न करणारच म्हणत डॉ. प्रकाश ताळे, डॉ. संदीप जोशी, डॉ. आशिष पाटील, डॉ. मेहमूद, डॉ. तनुश्री फडके, डॉ. शिरीन बागवान, डॉ. प्रशांत कुलकर्णी, डॉ. सागर पाटील, डॉ. संजय पाटील. डॉ. परेश पवार, डॉ. नरेंद्र पाटील यांच्यासह परिचारिका आणि सारा स्टाफ भारती यांच्यावर उपचार करत होता. हळूहळू डॉक्टरांच्या उपचाराला भारती प्रतिसाद देऊ लागल्या. 39 दिवसांनी त्या कोरोनातून पूर्णपणे बऱ्या झाल्या.
ग्रामस्थांनी केला डॉक्टरांचा सत्कार -
डॉक्टर व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळेच भारती बऱ्या झाल्या. त्यांना डिस्चार्ज देताना सर्वांना अश्रू अनावर झाले होते. डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी गावकऱ्यांनी संपूर्ण ग्रामीण रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांचा सत्कार केला.