जळगाव-काेराेनाचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांना पाेषण आहार मिळणार आहे. याबाबत प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून निर्णय घेण्यात आला आहे. सप्टेंबर ते नोव्हेंबरपर्यंतच्या ५६ दिवसांच्या पोषण आहाराचे वितरण विद्यार्थ्यांना करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना यात धान्याचे वाटप हाेणार आहे. दरम्यान, सप्टेंबरपर्यंतचे वाटप पूर्ण झाले असून, शासनाने मेनूमध्ये बदलाबाबतचे अभिप्राय मागितले आहे. त्यानुसार बदल होणे शक्य आहे. दरम्यान नवीन आहाराचे पुढील दहा दिवसांत वाटप सुरू होणार असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी एस. एस. चौधरी यांना दिली आहे.
शाळा बंद, तरी विद्यार्थ्यांना मिळणार दोन महिन्यांचा पोषण आहार - शालेय पोषण आहार
काेराेनाचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांना पाेषण आहार मिळणार आहे. याबाबत प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून निर्णय घेण्यात आला आहे. सप्टेंबर ते नोव्हेंबरपर्यंतच्या ५६ दिवसांच्या पोषण आहाराचे वितरण विद्यार्थ्यांना करण्यात येणार आहे.
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता सध्या शाळा बंद आहेत. दरवर्षी २६ जूनपासून शैक्षणिक सत्राला प्रारंभ हाेताे. मात्र यंदा यावर्षी कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे शाळा पूर्ण क्षमतेने केव्हा सुरू होतील, याबाबत अद्यापही सांगता येत नाही. त्यामुळे विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित राहू नये, यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या आदेशाने विद्यार्थ्यांना जून ते ऑगस्ट या कालावधीमध्ये पोषण आहाराचे वाटप करण्यात आले आहे. त्यानंतर आता शासनाने सप्टेंबर ते नोव्हेंबरपर्यंतच्या पोषण आहार वाटपास मंजुरी दिली असून,पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना आहाराचे वाटप करण्यात येणार आहे.
इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना अन्न शिजवून देण्यासाठीच्या खर्चाच्या दरानुसार ५६ दिवसांसाठी प्रती विद्यार्थी २५० रुपये लागतात. प्रत्येक विद्यार्थ्याला याच दरानुसार डाळ व कडधान्य पोषण आहाराच्या स्वरूपात देण्यात येणार आहे. सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना अन्न शिजवून देण्यासाठीच्या खर्चाच्या दरानुसार ५६ दिवसांसाठी प्रती विद्यार्थी ३७५ रुपये लागतात. त्यानुसार विद्यार्थ्यांना डाळ व कडधान्य देण्यात येईल. इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना ५ किलो ६०० ग्राम तांदूळ आणि इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ८ किलो ४०० ग्रॅम या प्रमाणात तांदळांचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागाच्या सूत्रांनी दिली.