जळगाव -लॉकडाऊनचे उल्लंघन होऊ नये, यासाठी पोलीस सध्या रस्त्यावर उतरले आहेत. तसेच नागरिक देखील अत्यावश्यक बाब सोडल्यास रस्त्यावर अथवा सार्वजनिक ठिकाणी येत नाहीत. याचाच एक सकारात्मक परिणाम गुन्हे घडण्याच्या संख्येवर झालेला दिसत आहे. जळगाव जिल्ह्यात मागील काही दिवसात क्राईम रेटमध्ये कमालीची घट झाल्याचे पहायला मिळत आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात संचारबंदीचा आदेश लागू झाला आहे. त्याचा परिणाम जिल्ह्यातील गुन्हेगारी विश्वावर झालेला आहे. जिल्ह्यातील गुन्हेगारीचा आलेख निम्म्याहून अधिक घटला आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस दलाकडून प्राप्त झाली आहे.
चोऱ्या दरोडे घटले मात्र, अवैध दारुचा सुळसुळाट...
जळगाव जिल्ह्यात संचारबंदी लागू होण्याच्या एक आठवडाआधी जिल्ह्यात हाणामारी, दंगल, खुनाचा प्रयत्न, विनयभंग, बलात्कार यासारखे १४१ गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. तर संचारबंदी लागू झाल्यापासून आठवडाभरात हाच आकडा निम्म्याहून अधिक घसरून अवघ्या ६२ वर आला आहे. याच कालावधीत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कलम १८८ अन्वये जवळपास १०० गुन्हे दाखल झाले आहेत. १५ मार्चपासून जिल्ह्यात ५६८ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यात अवैध दारु विक्रीचे ९०, जुगाराचे २४, आत्महत्या, अकस्मात मृत्यू ९१ व आगीच्या ५ घटना घडल्या आहेत. सध्याच्या काळात चोऱ्या, हाणामाऱ्या, वाहन चोरी अशा प्रकारचे गुन्हे कमी झाले आहेत.
पोलीस रस्त्यावर असल्याने सार्वजनिक स्तरावरील गुन्ह्यात घट...
संचारबंदीची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस रस्त्यावर असल्याने हे गुन्हे कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. २२ मार्चनंतर दाखल होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये लॉकडाऊनचे उल्लंघन, परदेश प्रवासाची माहिती लपवणे, फेक न्यूज सोशल मीडियावर व्हायरल करणे, दोन समाजात तेढ निर्माण होईल असा धार्मिक भावना भडकवणारा मजकूर व्हायरल करणे अशा प्रकारच्या गुन्ह्यांचा समावेश आहे.