जळगाव -अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाच्या अखत्यारीतील, वैध मापन शास्त्र (वजन व मापे) विभागाच्या जळगावातील सहायक नियंत्रक कार्यालयाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या कार्यालयाने गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील सुमारे अडीचशे पेट्रोल पंपांपैकी एकाही पेट्रोल पंपाची तपासणी केलेली नाही. त्यामुळे जळगाव जिल्हावासियांना पेट्रोल पंपांवर योग्य मापात इंधन मिळत आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, वैध मापन शास्त्र (वजन व मापे) विभागाच्या सहायक नियंत्रकांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना, वर्षभरात वेळोवेळी पेट्रोल पंपांची तपासणी मोहीम राबवण्यात येत असल्याचा दावा केला. परंतु, त्यांच्याकडे कारवाईची कोणतीही आकडेवारी उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत जिल्ह्यात खरोखर तपासणी मोहीम राबवली जात आहे का? असाही प्रश्नच आहे.
पेट्रोल पंप तपासणीचा वैध मापन शास्त्र विभागाला विसर प्रत्येक पेट्रोल पंपांवर इंधन भरण्यासाठी येणाऱ्या वाहनधारकांना योग्य मापात इंधन मिळावे म्हणून अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाच्या अखत्यारीत काम करणाऱ्या वैध मापन शास्त्र (वजन व मापे) विभागाचे नियंत्रण असते. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वैध मापन शास्त्र (वजन व मापे) विभागाचे सहायक नियंत्रक कार्यरत असतात. त्यांच्यामार्फत वर्षातून एकदा प्रत्येक पेट्रोल पंपावरील प्रत्येक पेट्रोल व डिझेल 'डिस्पेन्सिंग मशीन'ची तपासणी होणे आवश्यक आहे. याशिवाय वर्षभरात केव्हाही पेट्रोल पंपांची अचानकपणे तपासणी करणे अपेक्षित असते. पेट्रोल पंप चालकांनी डिस्पेन्सिंग मशीनमध्ये काही छेडछाड करून मापात पाप केली असेल तर अनियमितता समोर येऊन ग्राहकांची फसवणूक टळावी, हा अशा प्रकारच्या तपासणीचा उद्देश असतो. मात्र, जळगाव जिल्ह्यातील सुमारे अडीचशे पेट्रोल पंपांवर अशा प्रकारची तपासणीच होत नसल्याचे दिसून येत आहे. वैध मापन शास्त्र (वजन व मापे) विभागाच्या सहायक नियंत्रक कार्यालयाने गेल्या वर्षभरात अशा प्रकारची तपासणी केली नसल्याचे उघड झाले आहे. कारवाईची आकडेवारीच त्यांच्याकडे उपलब्ध नाही.
काय आहे नियमावली -पेट्रोल पंपांवर ग्राहकांची फसवणूक होऊ नये, म्हणून वैध मापन शास्त्र अधिनियम, महाराष्ट्र वैध मापन शास्त्र अंमलबजावणी नियमावली 2011 नुसार काही मार्गदर्शक तत्वे आहेत. याबाबत बोलताना जळगावचे सहायक नियंत्रक बी. जी. जाधव म्हणाले की, प्रत्येक पेट्रोल पंप चालकाने वर्षातून एकदा वैध मापन शास्त्र (वजन व मापे) विभागाच्या सक्षम अधिकाऱ्याच्या उपस्थितीत पंपावरील प्रत्येक डिस्पेन्सिंग मशीनची तपासणी करणे आवश्यक आहे. याशिवाय वैध मापन शास्त्र (वजन व मापे) विभागाला गरज भासल्यास तेव्हाही अशी तपासणी करून द्यावी. पंपावर येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला इंधन भरून देण्यापूर्वी डिस्पेन्सिंग मशीनवर शून्य रिडिंग दाखवावे, त्याचप्रमाणे, डिस्पेन्सिंग मशीनमध्ये काही स्पेअर पार्ट बदलायचा असेल किंवा मशीनमध्ये सॉफ्टवेअर अपडेट करायचे असेल तर वैध मापन शास्त्र (वजन व मापे) विभागाच्या पूर्वपरवानगी शिवाय काहीही करू नये, अशा प्रकारची नियमावली असल्याचे बी. जी. जाधव यांनी सांगितले.
अनियमितता आढळली तर चालतो खटला -एखाद्या ग्राहकाने पेट्रोल पंपावर अनियमितता होत असल्याबाबत तक्रार केली तर वैध मापन शास्त्र (वजन व मापे) विभागाचे सहायक नियंत्रक किंवा विभागीय निरीक्षकांकडून तक्रारीची पडताळणी केली जाते. त्यात अनियमितता समोर आली तर संबंधित पेट्रोल पंप चालकावर वैध मापन शास्त्र विभागामार्फत खटला दाखल केला जातो. अशा वेळी गैरतक्रारदार असलेला पेट्रोल पंप चालक हा वैध मापन शास्त्र विभागाकडे किंवा न्यायालयात खटला सुरू ठेवण्याची विनंती करू शकतो. त्यात अनियमिततेच्या स्वरूपानुसार दंडात्मक कारवाईचे प्रावधान आहे. दोन्ही ठिकाणी कारवाईचे स्वरूप सारखेच असल्याचेही बी. जी. जाधव यांनी सांगितले.
ग्राहकांना येथे करता येते तक्रार -इंधन योग्य मापात मिळत नसेल तर कोणत्याही ग्राहकाला थेट वैध मापन शास्त्र विभागाकडे तक्रार करता येते. त्यासाठी वैध मापन शास्त्र विभागाने मुख्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन केला असून, त्याठिकाणी 022-22622022 हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत तक्रार नोंदवली जाऊ शकते. एखाद्या ग्राहकाला लेखी स्वरूपात ऑनलाईन पद्धतीने तक्रार करायची असेल तर तो ग्राहक या विभागाच्या dclmms.complains@yahoo.com या ईमेल आयडीवर तक्रार पाठवू शकतो. तक्रार प्राप्त होताच संबंधित जिल्ह्यातील सहायक नियंत्रक किंवा विभागीय निरीक्षकांना ती नियंत्रण कक्षाकडून फॉरवर्ड केली जाते. याशिवाय ग्राहक जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या वैध मापन शास्त्र (वजन व मापे) सहायक नियंत्रक कार्यालयात तक्रार करू शकतो.
मायक्रो चिपच्या माध्यमातूनही होते फसवणूक -अनेक पेट्रोल पंपांवर डिस्पेन्सिंग मशीनमध्ये मायक्रो चिप बसवलेले असतात. या मायक्रो चिपच्या माध्यमातून मशीनच्या रिडिंगवर नियंत्रण मिळवलेले असते. देशात या पद्धतीने ग्राहकांची फसवणूक केल्याची काही प्रकरणे घडल्याची उदाहरणे आहेत. परंतु, जळगाव जिल्ह्यात अशा पद्धतीने फसवणूक केल्याचे एकही प्रकरण अद्यापपर्यंत समोर आलेले नाही. असे असले तरी खबरदारी म्हणून पेट्रोल पंपांची नियमित तपासणी होणे गरजेचे आहे, असाही ग्राहकांचा मतप्रवाह आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात अनेक ग्राहक इंधन योग्य मापात मिळत नसल्याची तक्रारच करत नसल्याचे चित्र आहे. वैध मापन शास्त्र विभागाकडे ग्राहकांच्या तक्रारीच येत नसल्याची माहिती मिळाली. ग्राहकांना तक्रार करण्याची पद्धत माहिती नसावी, हे त्यामागचे प्रमुख कारण मानले जाते.
पेट्रोल पंप चालक म्हणतात, शंका असेल तर निरसन करतो -या विषयासंदर्भात 'ईटीव्ही भारत'ने काही पेट्रोल पंपांवर जाऊन माहिती घेतली असता, योग्य मापात इंधन मिळण्यासंदर्भात ग्राहकांची काही तक्रार असेल तर आम्ही लागलीच तक्रारींचे निरसन करतो. याशिवाय नियमितपणे डिस्पेन्सिंग मशीनची तपासणी करून घेतो. इंधन विक्री करणाऱ्या कंपन्यांच्या निर्देशानुसार वेळोवेळी डिस्पेन्सिंग मशीनचे सॉफ्टवेअर अपडेट करून घेतो, अशी माहिती पेट्रोल पंप चालकांनी दिली.