महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पर्यावरण दिन विशेष : जळगावचे वैभव असलेल्या मेहरुण तलावात प्रदूषण वाढले, जलचरांचे अस्तित्त्व धोक्यात! - जलचर

तलावातील वाढत्या प्रदूषणामुळे त्यातील माशांच्या प्रजातींवर विपरित परिणाम होत असून, काही प्रजातींवर विकृती आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, प्रदूषित पाण्यात वाढणाऱ्या जलचरांची संख्या वाढल्याने मूळ अधिवास असलेले जलचर नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यापार्श्वभूमीवर 'ईटीव्ही भारत'ने घेतलेला हा विशेष आढावा...

पर्यावरण दिन विशेष
पर्यावरण दिन विशेष

By

Published : Jun 5, 2021, 5:04 AM IST

जळगाव - शहराचे वैभव मानला जाणारा मेहरुण तलाव अलीकडच्या काळात प्रदूषणाच्या विळख्यात सापडला आहे. तलावाच्या परिसरातील वाढती मानवी वस्ती, सांडपाण्याचा होणारा निचरा यासारख्या कारणांमुळे नैसर्गिक अधिवास धोक्यात येऊन तलावातील जलचरांवर संकट उभे राहिले आहे. या तलावातील प्रदूषण वेळीच रोखले नाही, तर जलचरांचे अस्तित्त्व संपुष्टात येण्याची भीती आहे. दरम्यान, तलावातील वाढत्या प्रदूषणामुळे त्यातील माशांच्या प्रजातींवर विपरित परिणाम होत असून, काही प्रजातींवर विकृती आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, प्रदूषित पाण्यात वाढणाऱ्या जलचरांची संख्या वाढल्याने मूळ अधिवास असलेले जलचर नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

जळगावचे वैभव असलेल्या मेहरुण तलावात प्रदूषण वाढले

वन्यजीव संरक्षण संस्थेचे अध्यक्ष रवींद्र फालक, सदस्य बाळकृष्ण देवरे, गौरव शिंदे, कल्पेश तायडे आदी मंडळी शहरातील मेहरुण तलावासह जिल्ह्यातील विविध नद्यांमधील जीवसृष्टीचा अभ्यास करत आहेत. सांडपाणी, रासायनिक द्रव्ये, टाकाऊ वस्तू तसेच जनावरे व कपडे धुणे यासारख्या कारणांमुळे नद्या, नाले, तलाव यातील पाण्याचे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याची बाब जीवसृष्टीचा अभ्यास करताना वन्यजीव संरक्षण संस्थेच्या सदस्यांच्या लक्षात आली. विशेष म्हणजे, मेहरुण तलावाच्या अभ्यासात अत्यंत धक्कादायक बाब लक्षात आली आहे. मेहरुण तलावाच्या पाण्याचे प्रदूषणाचे प्रमाण गेल्या काही वर्षांपासून वाढले आहे. यामुळे या ठिकाणी आढळणाऱ्या रासबोरा डॅनिकोनियस व मिस्टस ब्लिकेरी कॅटफिश या प्रजातीच्या माशांवर विकृती आली आहे. तसेच प्रदूषित पाण्यात वाढणारी चिलापी प्रजातीच्या माशांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे, असा निष्कर्ष वन्यजीव संरक्षण संस्थेच्या मत्स्य अभ्यासकांनी काढला आहे.

माशांचा आकार, रंगसंगती बदलली-

मेहरुण तलावातील जलप्रदूषणामुळे तेथील जीवसृष्टीला धोका निर्माण झाला आहे. याबाबत बोलताना वन्यजीव संरक्षण संस्थेचे बाळकृष्ण देवरे 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हणाले, मेहरुण तलाव हा जळगाव शहराचे वैभव आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या तलावाच्या पाण्याचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण झाले आहे. ते रोखण्यासाठी वेळीच उपाययोजना केल्या पाहिजे. पण दुर्दैवाने तसे होत नाही. तलावातील जलप्रदूषणामुळे जलचरांचा, खास करून मत्स्यजीवांचा अधिवास धोक्यात आला आहे. अनेक प्रजातींच्या माशांचा आकार बदलला आहे. रंगसंगती बिघडली आहे. काही माशांच्या शरीराचे स्नायू पूर्णपणे विकसित होत नसल्याची गंभीर बाब अभ्यासात समोर आली आहे. माशांसह खेकडे, झिंगे, पाण्यात आढळणारी वनस्पती यांच्या अधिवासात बाधा आली आहे. रासबोरा डॅनिकोनियस या प्रजातीच्या माशांच्या अंगावरील खवले कमकुवत झाले आहेत. खवले हे माशांच्या शरीरावरील एक महत्त्वाचा घटक आहे. तो कमकुवत होणे म्हणजे माशांचा जीवनक्रम घटणे होय. हा प्रमुख बदल धोक्याची घंटा आहे. दुसरीकडे, मिस्टस ब्लिकेरी कॅटफिशचा रंग पूर्णपणे बदलला असून, त्याच्या काही स्नायूंची वाढ देखील खुंटली आहे. पाण्याच्या प्रदूषणामुळे हे बदल घडले असावेत, असा आमचा प्राथमिक निष्कर्ष आहे. पुढील दीड ते दोन वर्षांत याबाबतचा अभ्यास पूर्ण होऊन वैज्ञानिक संशोधनाअंती आम्ही माशांच्या प्रजातींमध्ये काय आणि कसे बदल झाले, याची ठोस कारणे स्पष्ट करू. त्याचा सविस्तर शोधनिबंधही वन्यजीव संरक्षण संस्थेच्या वतीने प्रसिद्ध केला जाईल, अशी माहिती बाळकृष्ण देवरे यांनी दिली.

माशांचं बदलत स्वरूप

माशांच्या स्थानिक प्रजाती झपाट्याने होताय नष्ट-

मेहरुण तलावातील पाण्याचे प्रदूषण वाढल्यामुळे माशांच्या स्थानिक प्रजाती झपाट्याने नष्ट होत आहेत. पूर्वी याठिकाणी कोंबडा, लालपरी, रोहू, गेर अशा विविध स्थानिक प्रजातींचे मासे आढळत होते. यातील बहुतांश प्रजातींचे मासे आता आढळून येत नाहीत. तलावातील पाण्याचे प्रदूषण वाढल्यामुळे माशांच्या स्थानिक प्रजाती नष्ट होत असताना प्रदूषित पाण्यात वाढणाऱ्या परदेशी प्रजाती मात्र, झपाट्याने वाढत आहेत. त्यात चिलापी, मांगूर या प्रजातींचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल. आज मेहरुण तलावात मासेमारी करणाऱ्यांनी पकडलेले मासे पाहिले तर त्यात चिलापी व मांगूर हेच मासे अधिक प्रमाणात दिसून येतील. हे तलावातील वाढलेल्या प्रदूषणाचा पुरावा असल्याचेही बाळकृष्ण देवरेंनी सांगितले.

मानवी वस्ती वाढल्याने प्रदूषणात भर-

वन्यजीव संरक्षण संस्थेचे अध्यक्ष रवींद्र फालक यांनी यावेळी सांगितले की, मेहरुण तलाव हा जळगाव शहरातील एक प्रमुख नैसर्गिक अधिवास व जैवविविधतेने संपन्न असलेला प्रदेश होता. तलावाच्या परिसरात मानवी वस्ती नव्हती. परंतु, गेल्या काही वर्षात या तलावाच्या परिसरात मानवी वस्ती मोठ्या प्रमाणावर वाढली. त्यामुळे पाण्याचे प्रदूषण वाढत गेल्याने या तलावातील जीवसृष्टी धोक्यात आली आहे. ही जीवसृष्टी वाचवायची असेल तर पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. वन्यजीव संरक्षण संस्थेच्या वतीने तलावाच्या पाण्याचे परीक्षण केले जात आहे. त्यात माशांच्या काही प्रजातींवर विकृती आल्याचे प्राथमिक निष्कर्ष समोर आले आहेत. त्यावर अधिक अभ्यास सुरू असल्याचे रवींद्र पालक यांनी सांगितले.

तलावात घाणीचे साम्राज्य झाले आहे

जिल्ह्यातील नद्यांची हीच स्थिती -

जिल्ह्यातील तापी, गिरणा, बोरी, वाघूर, अंजनी, पूर्णा यासारख्या प्रमुख नद्याही प्रदूषित होण्याच्या मार्गावर आहेत. वाढते औद्योगिकीकरण व शहरीकरण, अमर्याद वाळू उपसा, सांडपाण्याचा निचरा यासारख्या कारणांमुळे नद्यांच्या प्रदूषणात मोठी वाढ होत आहे. मेहरुण तलावातील जीवसृष्टी ज्याप्रमाणे धोक्यात आलेली आहेत, अशीच परिस्थिती या सर्वच नद्यांमध्ये आहे. जलप्रदूषणामुळे जलचरांचा जीवनक्रम बाधित होत आहे, असाही निष्कर्ष वन्यजीव संरक्षण संस्थेच्या अभ्यासात काढण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details