जळगाव -लोकसभा व विधानसभा निवडणुकीत 2014 साली मोदी लाटेमुळे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे पानिपत झाले. मात्र, एरंडोल-पारोळा विधानसभा मतदारसंघात डॉ. सतीश पाटील हे खानदेशातून राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव विजयी उमेदवार ठरले. 1996 पासूनचा इतिहास बघितला तर आतापर्यंत डॉ. सतीश पाटील व शिवसेनेचे माजी आमदार चिमणराव पाटील यांच्यात पाचवेळा लढत झाली आहे. यावेळी युती व आघाडी झाल्यास सहाव्यांदा पुन्हा त्यांच्यातच लढत रंगण्याची शक्यता आहे. डॉ. सतीश पाटील हे तीनदा तर चिमणराव पाटील हे दोन वेळेस आमदार झाले आहेत. भाजपची विजयी घोडदौड पाहता यावेळी राष्ट्रवादी काँग्रेससमोर एकमेव जागा टिकवण्याचे आव्हान आहे.
आमदार डॉ. सतीश पाटील हे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतही राष्ट्रवादीकडून लढले होते. त्यावेळी भाजपचे उमेदवार ए. टी. पाटील यांनी त्यांना पराभूत केले होते. त्यानंतर सहा महिन्यात झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत पाटील यांनी शिवसेनेचे उमेदवार चिमणराव पाटील यांना पराभूत केले होते. या निवडणुकीत भाजप आणि सेना स्वतंत्र लढली होती. विशेष म्हणजे, भाजपचे उमेदवार तथा जळगाव जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मच्छिंद्र पाटील यांच्या प्रचारार्थ एरंडोल मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा झाली होती. मात्र, मोदींची प्रचारसभा होऊनही डॉ. सतीश पाटील यांनी विजय संपादन केला होता.२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत एरंडोल मतदारसंघात राष्ट्रवादीच्या गुलाबराव देवकर यांच्या विरोधात भाजपच्या उमेश पाटील यांनी तब्बल ७२,३४४ मतांची आघाडी घेतली. आमदार डॉ. पाटील यांचे मुळगाव तामसवाडीत भाजपला राष्ट्रवादीपेक्षा आश्चर्यकारक मताधिक्य मिळाले. या मतदारसंघात २००४ चा अपवाद वगळता मतदारांनी गेल्या पाच पंचवार्षिक निवडणुकांपासून सत्ता विरोधात कौल दिलेला आहे.
हेही वाचा -जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघ : काँग्रेसची खेकडावृत्ती पडणार भाजपच्या पथ्यावर ?
राजकीय व सामाजिक समीकरणे-
एरंडोल व पारोळा या 2 तालुक्यांचा मोठा भाग मिळून तयार झालेला हा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात मराठा समाजाच्या उमेदवाराला संधी अधिक असते. शिवसेना व राष्ट्रवादी हे मतदारसंघातील पारंपरिक विरोधक आहेत. दोन्ही पक्षांच्या संभाव्य उमेदवारांना आमदारकीचा अनुभव, शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून असलेले संघटन, कार्यकर्त्यांचा फौजफाटा या गोष्टींचा फायदा होतो. यावेळी पाटील यांचे पुतणे नगराध्यक्ष करण पाटील यांच्या उमेदवारीच्या शक्यतेने निवडणुकीची समीकरणे बदलून तिरंगी तर गेल्या वेळचे भाजपचे उमेदवार मच्छिंद्र पाटील यांनी पुन्हा निवडणूक लढविल्यास चौरंगी लढत होईल. त्यामुळे धक्कादायक निकाल समोर येतील. मतदारसंघातील जातीय गणितांचा विचार केल्यास पहिल्या क्रमांकावर मराठा समाज आहे. मराठा समाज याठिकाणी 40 ते 45 टक्के आहे. त्यानंतर 20 टक्के माळी समाज, तेली समाज 10 ते 12 टक्के आहे. त्याच बरोबरीने मुस्लिम समाजाचा क्रमांक लागतो. राजपूत समाज देखील या ठिकाणी 5 टक्के असून त्यांचे मतदान निर्णायक ठरते.
हेही वाचा -जळगाव ग्रामीण मतदारसंघ: घरकुल घोटाळा उघडला अन् दोन 'गुलाबां'चा संघर्ष टळला!
'हे' असू शकतात संभाव्य उमेदवार-
एरंडोल-पारोळा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार डॉ. सतीश पाटील हे पुन्हा इच्छुक आहेत. शिवसेनेकडून माजी आमदार चिमणराव पाटील हे इच्छुक आहेत. मनसेकडून सध्या कोणतेच नाव चर्चेत नाही. राज्यात शिवसेना-भाजप युती अनपेक्षितपणे फिस्कटली तर भाजपकडून पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पाटील किंवा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मच्छिंद्र पाटील हे संभाव्य उमेदवार असू शकतात.