जळगाव -जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील देवळी येथील मूळ रहिवासी असलेल्या एका 46 वर्षीय अभियंत्याचा नायजेरियात सोमवारी (20 एप्रिल) रात्री कोरानामुळे मृत्यू झाला. त्यांच्या पत्नीलाही कोरोनाची लागण झाली असून, त्या नायजेरियातील हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत आहेत. या घटनेमुळे देवगाव-देवळीत एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.
देवळी येथील मूळ रहिवासी असलेले दाम्पत्य गेल्या 16 वर्षांपासून नायजेरियात स्थायिक झाले आहे. एका कंपनीत अभियंता म्हणून ते कार्यरत होते. कोरोनाची लागण झाल्याने गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर नायजेरियात औषधोपचार सुरू होते. मात्र, सोमवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेची माहिती त्यांच्या पत्नीस नायजेरीयातील डॉक्टरांनी दिली. त्यांच्या पत्नीने धुळे येथील त्यांच्या नातलगांना भ्रमणध्वनीवरून पतीच्या मृत्यूबाबत कळविले. ही माहिती मिळताच त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मयत अभियंत्याच्या पश्चात पत्नी, आई, मुलगी असा परिवार आहे. त्यांची मुलगी गोवा येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असून, सध्या लॉकडाऊनमुळे नाशिक येथे मावशीकडे अडकली आहे.