जळगाव -जिल्ह्यातील भडगाव येथे जमावाच्या मारहाणीत वायरमन गजानन राणे यांचा मृत्यू झाला होता. तर उप कार्यकारी अभियंता अजय धामोरे जखमी झाले होते. 7 जूनला दुपारी 1 वाजेनंतर ही घटना घडली होती. या घटनेची राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दखल घेतली आहे. या घटनेच्या दुसऱ्या दिवशी मंत्री राऊत यांनी फोनवरून राणे कुटुंबीयांचे सांत्वन केले. धामोरे यांचीही त्यांनी विचारपूस केली.
कृषी पंपांच्या वीज बिलांची महावितरण कंपनीकडून सक्तीने वसुली होत असल्याने सोमवारी (दि. 7 जून) शिवसेनेकडून भडगाव व पाचोरा तालुक्यात महावितरणच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. सर्वत्र हे आंदोलन शांततेत पार पडले. परंतु, भडगाव येथे चाळीसगाव रस्त्यावरील कार्यालयात दुपारी 1 वाजेच्या सुमारास अज्ञात 7 जण आले. त्यांनी उपकार्यकारी अभियंता अजय धामोरे यांना मारहाण करत कार्यालयातील साहित्याची तोडफोड केली. यावेळी हल्लेखोरांच्या तावडीतून धामोरे यांना सोडवण्यासाठी गेलेले गजानन राणे यांनाही मारहाण झाली. त्यात ते जमिनीवर पडले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला होता.