जळगाव- केंद्र सरकारच्या खासगीकरणाच्या धोरणाविरुद्ध देशभरातील आयुध निर्माणीतील कर्मचारी एकवटले आहेत. आयुध निर्माणींच्या खासगीकरणाचा निर्णय रद्द करावा, या प्रमुख मागणीसाठी सर्व कर्मचाऱ्यांनी अखिल भारतीय स्तरावर संपाचे हत्यार उपसले आहे. संप सुरू होऊन 5 दिवस उलटले असले तरी सरकारने या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेतलेली नाही.
देशभरातील 41 आयुध निर्माणींच्या खासगीकरणाचा घाट केंद्र सरकारने घातला आहे. या निर्णयामुळे देशाच्या संरक्षण क्षेत्राला धोका उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. याशिवाय आयुध निर्माणींमध्ये पूर्णवेळ काम करणाऱ्या तब्बल 82 हजार कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर देखील सरकारच्या या निर्णयामुळे गदा येण्याची भीती आहे. याच कारणांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याने आयुध निर्माणीतील विविध कर्मचारी संघटनांनी 20 ऑगस्टपासून संपाचे हत्यार उपसले आहे. संप सुरू होऊन देखील सरकारने आंदोलनाची दखल घेतलेली नाही. आयुध निर्माणींच्या खासगीकरणाच्या निर्णयानंतर कर्मचाऱ्यांमध्ये उमटलेले पडसाद लक्षात घेऊन केंद्र सरकारने या निर्णयाची पडताळणी करण्याचे आश्वासन कर्मचारी संघटनांना दिले आहे.
त्यामुळे या संपाचा पहिला टप्पा 26 ऑगस्टला स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारने याप्रश्नी सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर मात्र, बेमुदत संप पुकारण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.