जळगाव -गेल्या सात महिन्यांपासून कोरोनाविरोधात आरोग्य यंत्रण लढा देत असून आता कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव काही अंशी कमी होताना दिसत आहे. एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना दूसरीकडे शहरात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. दरम्यान डेंग्यू रोखण्यासाठी महापालिकेने अद्याप कोणतीही उपाययोजना केली नसल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
नगरसेवक अॅड. दिलीप पोकळे, नवनाथ दारकुंडे, चेतन सनकत, प्रतीभा पाटील, प्रतीभा देशमुख, शिवसेनेचे प्रशांत नाईक, एमआयएमचे गटनेते रियाज बागवान यांनी छत्रपती शाहू महाराज रुग्णालयाला भेट दिली. महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलाणी यांच्याकडून शहरातील मनपाच्या कोविड केअर सेंटरमधील रुग्णसंख्येची माहिती घेतली. काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाल्यामुळे महापालिकेने काही कोविड केअर सेंटर बंद केल्याची माहिती देण्यात आली.
महापालिकेची रुग्णालये पूर्ण क्षमतेने सुरू करा -
कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे कोविड केअर सेंटरमध्ये काम करत असलेल्या मनपा वैद्यकीय विभागाच्या कर्मचाऱ्यांना आता महापालिका रुग्णालयात आणून, महापालिकेचे रुग्णालये पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा सूचना नगरसेवकांनी दिल्या. महापालिकेच्या काही रुग्णालयात सध्या ओपीडी सुरू असून, इतर तपासण्या बंद आहेत. आता त्या देखील सुरू करण्याच्या सूचना नगरसेवकांनी दिल्या आहेत.