जळगाव-बसच्या चाकाखाली आल्याने एका 70 वर्षीय वृद्धेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी साडेअकरा वाजताच्या सुमारास जळगाव शहरातील नवीन मध्यवर्ती बसस्थानकात घडली. देवकाबाई नारायण सपकाळे (वय 70, रा. कानळदा, ता. जळगाव) असे अपघातात ठार झालेल्या वृद्धेचे नाव आहे. याप्रकरणी बस चालकाविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बसच्या चाकाखाली आल्याने वृद्धेचा जागीच मृत्यू नातेवाईकांकडे साखरपुड्याच्या कार्यक्रमाला गेली होती वृद्धा-देवकाबाई सपकाळे या चाळीसगाव येथे नातेवाईकांकडे साखरपुड्याच्या कार्यक्रमाला गेलेल्या होत्या. आज (शुक्रवारी) त्या चाळीसगाव येथून घरी परत येत होत्या. चाळीसगावहून त्या बसने जळगावात आल्या. जळगाव बसस्थानकातून त्या बसने आपल्या घरी कानळदा येथे जाणार होत्या. त्या बसस्थानकात असताना मनमाड-भुसावळ (एमएच 14 बीटी 564) बस आली. बसचालक बस फलाटावर लावण्यासाठी मागे घेत होता. तेव्हा बसच्या मागे वृद्धा असल्याची कल्पना न आल्याने त्याने थेट बस मागे घेतली. याच वेळी देवकाबाई बसच्या चाकाखाली आल्या. बसचे चाक डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
बहिणींसमोरच घडली घटना-देवकाबाई त्यांच्या बहिणी लिलाबाई व्यंकट सोनवणे (रा. लाडली, ता. धरणगाव) व सिंधुबाई मुरलीधर अहिरे (रा. चिंचाळे, ता. जळगाव) यांच्यासोबत जळगावात आल्या होत्या. तिन्ही बहिणी सोबत असताना देवकाबाई यांचा अपघाती मृत्यू झाला. डोळ्यादेखत बहिणीचा मृत्यू झाल्याने लिलाबाई आणि सिंधुबाई यांनी हृदय हेलावणारा आक्रोश केला.
जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल-ही घटना घडल्यानंतर जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक विलास शेंडे हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलवला. त्यानंतर लिलाबाई सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.