जळगाव- दारूच्या नशेत मोठ्या भावाने लहान भावाचा डोक्यात लाकडी दांडा मारून खून केला. ही धक्कादायक घटना आज सकाळी ५.३० वाजेच्या सुमारास शहरातील पिंप्राळा हुडकोत घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी संशयित आरोपीस अटक केली आहे.
दीपक प्रल्हाद मरसाळे (वय २५, रा. पिंप्राळा, हुडको) असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याचा मोठा भाऊ जय मरसाळे याने त्याचा खून केला. दीपक हा वडील प्रल्हाद तानकू मरसाळे यांच्यासह राहत होता. शुक्रवारी सायंकाळी ७ वाजेपासून जय व दीपक या दोघांमध्ये वाद सुरू होता. वडील प्रल्हाद व जय याच्या पत्नीने वाद सोडवले होते. यानंतर रात्री ९.३० वाजता शेजारी असलेल्या खोलीत झोपण्यासाठी ते निघून गेले होते. एका खोलीत जय व दीपक हे दोघेच थांबले होते. रात्री पुन्हा एकदा दोघांमध्ये वाद झाला. यानंतर जयने दीपकच्या डोक्यावर लाकडी दांडा मारून त्याचा खून केला.
सकाळी ५.३० वाजता जयने शेजारच्या खोलीत झोपलेल्या वडिलांना आवाज देऊन उठवले. दीपक याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे तो सांगू लागला. यावेळी त्याच्या वडिलांसह इतर लोकांनी खोलीत जाऊन पाहिले असता दीपक हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्याच्या डोक्यात वार केल्याचे दिसून आले. यानंतर प्रल्हाद मरसाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयीत जयला अटक केली आहे.