जळगाव - भाजपने पहिल्या यादीत ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंना डावलल्याने खडसे समर्थक चांगलेच आक्रमक झाले आहेत. मुक्ताईनगरातील जाहीर सभेनंतर समर्थकांनी खडसेंच्या कोथळी येथील घरासमोर ठिय्या मांडत पक्षाचे काम न करण्याचा निर्णय घेतला. पक्ष जर प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांचे अशा रितीने पंख छाटत असेल तर आजच पक्षाचा राजीनामा देऊन टाका, अशी गळ समर्थकांनी खडसेंना घातली.
हेही वाचा-विधानसभा निवडणूक 2019 : चार ऑक्टोबरला मुख्यमंत्री भरणार उमेदवारी अर्ज
एकनाथ खडसेंनी आक्रमक झालेल्या समर्थकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, समर्थक ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. ज्या पक्षासाठी आयुष्याची ४० वर्षे घालवली. त्याच पक्षाने अशी वागणूक द्यायला नको, अशी अपेक्षा समर्थकांनी यावेळी व्यक्त केली. ठिय्या मांडणाऱ्या समर्थकांमध्ये मुक्ताईनगर तालुक्यातील समर्थकांचा समावेश आहे. आता अजून वाट पाहू नका, आजच तो निर्णय जाहीर करुन टाका, अशी विनंती समर्थकांनी खडसेंना केली. मात्र, खडसेंनी लागलीच निर्णय घेणे योग्य नाही. पुढे काय घडते याची अजून वाट पाहूया, असे समर्थकांना सांगितले.
पहिल्या यादीत डावलल्याने एकनाथ खडसेंचे समर्थक आक्रमक ...तर भाजपच्या नेत्यांना गावात घुसू देणार नाही-
भाजपने एकनाथ खडसे यांच्या बाबतीत योग्य तो निर्णय घेतला नाही तर आम्ही भाजपच्या नेत्यांना गावात घुसू देणार नाही, असा निर्णय देखील काही समर्थकांनी यावेळी जाहीर केला. गावागावात तसे फलक लावले जातील, अशी भूमिका आक्रमक झालेल्या समर्थकांनी घेतली.