जळगाव -भाजपाचे माजीमंत्री एकनाथ खडसे यांची एका कार्यकर्त्यासोबत झालेल्या संवादाची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये 'आपण महिनाभरात भाजपा सोडणार असून, दुसऱ्या पक्षात काय पद मिळते, केवळ याची प्रतीक्षा आहे', असा संवाद खडसेंनी कार्यकर्त्यासोबत केला आहे. या ऑडिओ क्लिपमुळे खडसेंच्या पक्षांतराची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. मात्र, एकनाथ खडसे यांनी पक्षांतराचा इन्कार केला असून, कार्यकर्ते आपल्याला अशा प्रकारची विचारणा करतच असतात, असे त्यांनी सांगितले.
खडसेंवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर त्यांनी पक्षातील काही मंडळींमुळे आपली राजकीय कारकीर्द संपवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला होता. तेव्हापासून खडसे हे पक्ष सोडणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली, पक्षाच्या राज्य कार्यकारिणीत त्यांना स्थान दिले गेले नाही. आता तर राष्ट्रीय कार्यकारिणीतही स्थान न दिल्यामुळे त्यांची नाराजी अधिकच वाढली आहे. त्यात त्यांना काही कार्यकर्ते फोन करून योग्य निर्णय घ्या, अशी विनवणी करत आहेत. अशाच प्रकारे भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील रोशन भंगाळे नामक एका कार्यकर्त्याने एकनाथ खडसे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून पक्ष सोडण्याविषयी चर्चा केली. या चर्चेची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.