जळगाव -भाजप नेत्या तथा केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी सध्या युतीच्या प्रचारार्थ महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मंगळवारी रात्री जळगाव जिल्ह्यातील सावदा येथे प्रचारसभा आयोजित केली होती. यावेळी सभेला माजीमंत्री एकनाथ खडसे उपस्थित होते. खडसे यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान व्हायची इच्छा व्यक्त केल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. गुजरातमधील एका छोट्याशा कुटुंबात जन्मलेले तसेच चहा विकणारे नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान होऊ शकतात, तर आपण का पंतप्रधान होऊ शकत नाही. आपणही पंतप्रधान होण्याची इच्छा का बाळगू नये, असे यावेळी खडसे म्हणाले.
दरम्यान, तत्पूर्वी खडसेंनी आपल्या भाषणाला हिंदीतून सुरुवात केली. त्यावेळी स्मृती इराणी यांनी त्यांना मराठीतून बोलण्याची विनंती केली. मात्र, खडसेंनी 'मला हिंदीतून भाषण करायला आवडते. मी हिंदी विसरू नये म्हणून कधी कधी हिंदीतून भाषण करतो. माझीही संसदेत यायची मनापासून इच्छा होती. असे सांगत आपल्या मनातील भावना जाहीरपणे सांगून टाकली.