जळगाव- ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावर भाजपने सातत्याने अन्याय केला. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी नाही, पण राज्याच्या नेतृत्त्वाने त्यांना सतत लक्ष्य केले. त्यांचे राजकीय जीवन उद्ध्वस्त करण्याचा नेहमी कोणत्या तरी माध्यमातून प्रयत्न झाला. आज त्यांनी इच्छा नसतानाही भाजपच्या सदस्यत्वाच्या राजीनामा दिला. त्यांच्या निर्णयाचे आम्ही स्वागतच करतो. त्यांचा आदेश आम्हाला शिरसावंद्य आहे, आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, अशा भावना एकनाथ खडसे यांच्या जळगावातील समर्थकांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केल्या आहेत. त्यांच्याशी संवाद साधला आहे, आमचे प्रतिनिधी प्रशांत भदाणे यांनी...
एकनाथ खडसेंच्या निर्णयाचे स्वागतच, त्यांचा आदेश आम्हाला शिरसावंद्य; खडसे समर्थकांची भावना - राष्ट्रवादी काँग्रेस एकनाथ खडसे
खडसेंना मंत्रिपद मिळाले तर जळगाव जिल्ह्याच्या विकासाचा गाडाही हलण्यास मदत होईल. जळगाव जिल्ह्यातील अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प रखडले आहेत. खडसेंना मंत्रिपद मिळाले तर जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल, असेही मत काही समर्थकांनी व्यक्त केले.
एकनाथ खडसे यांनी आपल्या आयुष्याची 40 वर्षे भाजपच्या उभारणीसाठी खर्ची घातली. ज्यावेळी जळगाव जिल्हाच नव्हे तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात भाजपचे काम करण्यासही कुणी धजावत नव्हते. जेव्हा लोक भाजपच्या कार्यकर्त्यांना शिव्या-शाप देत होते, दगडधोंडे मारत होते, अशा काळात एकनाथ खडसे यांनी भाजपच्या वाढीसाठी प्रयत्न केले. रक्ताचे पाणी करून त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत भाजपला सुगीचे दिवस आणले. भाजपचे एका छोट्याशा रोपट्यापासून वटवृक्षात रूपांतर केले. पण सुगीच्या काळात भाजपच्या राज्याच्या नेतृत्त्वाने त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला. राज्यात 2014 मध्ये युती सरकार आल्यानंतर खडसेंच्या नावाची मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत चर्चा होती. पण तेथूनच त्यांच्या खच्चीकरणाची सुरुवात झाली. पुढे साडेचार वर्षे त्यांच्यावर अन्याय झाला. एवढंच नाही तर त्यांना पक्षाच्या निर्णय प्रक्रियेतूनही बाहेर काढण्यात आले. त्यामुळे खडसेंनी काय तो निर्णय घ्यावा, अशी आम्हा समर्थकांची मागणी होती. अखेर खडसेंनी योग्य निर्णय घेतला. त्याचे स्वागतच करतो, अशी भावना काही समर्थकांनी व्यक्त केली.
हेही वाचा -आजचा दिवस आमच्यासाठी अत्यंत दुःखदायक, पण मी भाजप सोडणार नाही- रक्षा खडसे
एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निवड केली, ही चांगली गोष्ट आहे. राष्ट्रवादी काँग्रेस राज्याच्या सत्तेत असल्याने आता खडसेंच्या राजकीय पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. खडसेंना मंत्रिपद मिळाले तर जळगाव जिल्ह्याच्या विकासाचा गाडाही हलण्यास मदत होईल. जळगाव जिल्ह्यातील अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प रखडले आहेत. खडसेंना मंत्रिपद मिळाले तर जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल, असेही मत काही समर्थकांनी व्यक्त केले.