जळगाव - 'एकनाथ खडसे थकलेत, म्हातारे झाले आहेत, असे पक्षाला वाटत असेल तर आपण घरी नातू-पणतू सांभाळत बसू', अशी उद्विग्नता माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी बोलून दाखविली आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ खडसे यांनी दिवाळीच्या फराळासाठी पत्रकारांना जळगावातील त्यांच्या 'मुक्ताई' या निवासस्थानी निमंत्रित केले होते. यावेळी खडसेंनी हे विधान केले. गेल्या काही वर्षांपासून भाजपमध्ये एकाकी पडलेले खडसे आक्रमक झाले आहेत. भाजपकडे आता विखे पाटील यांच्यासारखे अनुभवी लोकं असल्यावर खडसेंची गरज भासणार नाही, असाही चिमटा देखील खडसेंनी यावेळी काढला.
एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया हेही वाचा - जे मिळवायचे ते आत्ताच मिळवा, विसंबून राहू नका, सत्यजीत तांबेंचा आदित्य ठाकरेंना सल्ला
खडसे पुढे म्हणाले, 'राजकारणाचा 40 वर्षांचा अनुभव मला आहे. अनेक गोष्टी घडताना, बिघडताना मी पाहिल्या आहेत. तो अनुभव वाया जावू नये असे वाटते. त्यामुळेच आपण आत्मचरित्र लिहून त्यात या घटना सविस्तर मांडणार आहोत. त्यात 25-30 अशा घटना असतील; ज्या अद्याप कुणालाही माहिती नाहीत', असा गौप्यस्फोट देखील त्यांनी केला. 'आपण सरकार विरोधी वक्तव्ये कधीच केली नाहीत. मात्र, आपली वक्तव्ये हे अर्धी तोडून मोडून दाखवली गेली', असा आरोपच खडसेंनी केला. आपल्याला पक्षाकडून न्याय अपेक्षित आहे, असेही खडसे म्हणाले. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाबद्दल बोलताना खडसे म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे तेच ठरलेले आहे आणि तेच होणार आहे. मुख्यमंत्रीपदी पुन्हा देवेंद्र फडणवीस विराजमान होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सुरेश जैन यांना मुख्यमंत्री करा म्हणून मी पाठबळ दिले -
शिवसेनेचे नेते सुरेश जैन यांना मुख्यमंत्री बनवा हे सांगण्यासाठी आपण बाळासाहेब ठाकरेंकडे गेलो होतो. त्यावेळी आपल्यासोबत नितीन गडकरी उपस्थित होते. मात्र, बाळासाहेबांनी सुरेश जैन हे व्यापारी असल्यामुळे त्यांच्या हातात सत्ता देण्यास नकार दिला होता. त्यावेळेस बाळासाहेबांची उंची आपल्याला कळली, असे खडसे म्हणाले.