जळगाव -भाजपचे ज्येष्ठ नेते जे. पी. नड्डा यांची 4 दिवसांपूर्वी आपण भेट घेतली. या भेटीत विधानसभा निवडणूक, राज्यातील राजकीय परिस्थिती संदर्भात चर्चा केली. स्वकियांनी पक्षविरोधी कारवाया केल्याने विधानसभा निवडणुकीत भाजपला फटका बसला, याचीही माहिती दिली. माझे म्हणणे ऐकून घेत नड्डा यांनी चौकशीअंती जे दोषी असतील, त्या गद्दारांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिल्याची माहिती एकनाथ खडसे यांनी दिली.
हेही वाचा -'सिंहासन' चित्रपटाप्रमाणे राज्याच्या राजकारणात घडामोडी घडताहेत - एकनाथ खडसे
लेवा एज्युकेशनल युनियनच्या शताब्दी महोत्सवाच्या समारोप समारंभासाठी एकनाथ खडसे गुरुवारी सायंकाळी जळगावला आले होते. या समारंभानंतर ते माध्यमांशी बोलत होते. खडसे पुढे म्हणाले, राज्याच्या काही भागात ज्या घटना घडल्या आहेत, त्यांचीही माहिती जे. पी. नड्डा यांना देण्यात आली आहे. पक्षाच्या आपल्याच कार्यकर्त्यांनी विरोधात काम केल्यामुळे काही ठिकाणी जागांना धक्का बसला. माझे म्हणणे ऐकून घेण्यात आले आहे. मी दिलेली माहिती तसेच पक्षाकडे असलेली माहितीच्या आधारे चौकशी करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. त्यासाठी नड्डा यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार तसेच पंकजा मुंडेंना भेटीसाठी दिल्लीत बोलावले आहे.