जळगाव-भाजप नेते तथा माजीमंत्री एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. यासंदर्भात दररोज काहीतरी घडामोडी घडत असतानाच, आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारे एक क्विट त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून केले होते. जयंत पाटील यांचे तेच ट्विट भाजपा नेते एकनाथ खडसे यांनी रिट्विट केले. त्यामुळे खडसे अॅक्शन मोडमध्ये आल्याची चर्चा रंगली असून, त्यांनी एकप्रकारे भाजपला सोडचिठ्ठी देत असल्याचे अप्रत्यक्ष संकेतच दिले आहेत. मात्र, ते ट्विट नंतर डिलीट करण्यात आले आहे.
जयंत पाटील यांनी ट्विटरवर केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की 'आजच्या भाषणात पंतप्रधान काहीतरी नवीन सांगतील. कोरोना व आर्थिक संकटावर मात करण्यासाठी मार्ग देतील. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा देतील असे वाटले होते. मात्र, यापैकी त्यांनी काहीच केले नाही. महाराष्ट्राचा, देशाचा भ्रमनिरास केला'. अशी टीका जयंत पाटील यांनी आपल्या ट्विटद्वारे नरेंद्र मोदी यांच्यावर केली होती.