जळगाव-पुढच्या कालखंडात कोण किती सक्षम आहे आणि कुणाच्या मागे किती लोक आहेत हे लवकरच कळेल, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपा नेते गिरीश महाजन यांना टोला लगावला आहे. एकनाथ खडसे गुरुवारी सायंकाळी मुक्ताईनगर येथे त्यांच्या फार्महाऊसवर पत्रकारांशी बोलत होते.
कुणाच्या मागे किती लोकं हे लवकरच कळेल; खडसेंचा गिरीश महाजन यांना टोला
कुणाच्या मागे किती लोक आहेत हे लवकरच कळेल, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपा नेते गिरीश महाजन यांना टोला लगावला आहे.
एकनाथ खडसे यांनी भाजपा सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर पक्ष संघटनेचा आढावा घेण्यासाठी भाजपाकडून जिल्ह्यात बैठकांचे सत्र सुरू आहे. जिल्ह्यातील पारोळा येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत माजीमंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्या पक्षांतरावर टीका करताना, 'कुणी पक्षातून गेल्याने पक्षाला भगदाड काय पण साधं छिद्रही पडणार नाही', असे वक्तव्य केले होते. महाजन यांच्या वक्तव्याचा खडसेंनी समाचार घेतला. आपले कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात जाऊ नये म्हणून असे म्हणावे लागते; परंतु आता भाजपातून अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस तसेच काँग्रेसमध्ये जात आहेत. पुढच्या कालखंडात कोण किती सक्षम आहे, कुणाच्या मागे किती लोक आहेत, हे लवकरच कळेल. हे चित्र एका दिवसात दिसत नाही, असे खडसे यांनी सांगितले.
विधानपरिषदेसाठी नाव आले तर आनंदच-
मी कोणत्याही अपेक्षेने राष्ट्रवादीत आलेलो नाही. माझ्या मतदारसंघात अनेक विकासकामे मंजूर आहेत; परंतु ती रखडली आहेत. विकासाच्या अनुषंगाने मी पक्षांतर केले आहे. पक्षाकडे मी आमदारकी किंवा खासदारकी मागितलेली नाही. पक्षाने मला स्वतःहून दिले, तर आनंदच आहे. मी पक्षासाठी काम करतच राहणार आहे. विधानपरिषदेसाठी पक्षाकडून माझे नाव आले, तर मला आनंदच राहील, असेही खडसे यावेळी म्हणाले.