जळगाव- गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते तथा माजीमंत्री एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा आहे. आता या चर्चेला पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. एकनाथ खडसे यांनी आपल्या भाजप सदस्यत्वाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे दिल्याची माहिती समोर येत आहे. आता ते येत्या गुरुवारी (22 ऑक्टोबर) राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. मुंबईत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या उपस्थितीत त्यांचा पक्ष प्रवेश सोहळा होणार असल्याचे बोलले जात आहे.
एकनाथ खडसेंचा भाजप सदस्यत्वाचा राजीनामा? लवकरच हाती घड्याळ बांधणार असल्याची चर्चा - खडेसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश
भाजप नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला असल्याची माहिती मिळत आहे. खडसे लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचेही त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात येत आहे. आज त्यांना चंद्रकांत पाटील यांच्याकडे भाजपच्या सदस्यत्वचा राजीनामा पाठवला असल्याचे समजते
एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्याबाबत अनेक मुहूर्त सांगण्यात आले. मात्र, हे मुहूर्त आपण दिले नसल्याचे सांगून खडसे यांनी स्पष्ट शब्दांत नकार दिला होता. आता त्यांच्याच निकटवर्तीयांनी गुरुवारी ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे सांगितले आहे. याबाबत अधिक माहिती घेतली असता, खडसे यांनी दोन दिवसांपूर्वी भाजप सदस्यत्वाचा राजीनामा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठवल्याची माहिती समोर येत आहे. शनिवारी (16 ऑक्टोबर) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची त्यांनी थेट घेतली. यावेळी दोघांनी स्वतंत्र गुप्तगू केले. त्याचवेळी त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाचे निश्चित झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.
आज त्यांच्या निकटवर्तीयांनी गुरुवारी होणाऱ्या प्रवेशाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना फोन करून माहिती दिली, असे सांगितले जात आहे. राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांनी त्याला दुजोरा दिला आहे. गुरुवारी मुंबई येथे पक्षाचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा होणार असल्याचे निश्चित झाले आहे, असे सांगण्यात येत आहे. याबाबत स्वतः एकनाथ खडसे यांनी मात्र, अधिकृत घोषणा अद्यापपर्यंत केलेली नाही.