महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'उपयोगिता प्रमाणपत्र नसल्याने 65 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झालाच असावा' - फडणवीस आणि खडसे

फडणवीस सरकारने आपल्या कार्यकाळातील 65 हजार कोटी रुपयांच्या खर्चाबाबतचे उपयोगिता प्रमाणपत्र अद्याप सादर केलेले नसल्याने त्यात घोटाळा झालाच असावा, असे आज तरी स्पष्ट होत असल्याचे एकनाथ खडसेंनी म्हटले आहे.

jalgaon
eknath khadse

By

Published : Dec 22, 2019, 3:12 PM IST

जळगाव- देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात 65 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याच्या आरोपावरून राज्याच्या वर्तुळात खळबळ उडालेली आहे. असे असताना भाजपचे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसेंनी धक्कादायक वक्तव्य करत भाजपची कोंडी केली आहे. फडणवीस सरकारने आपल्या कार्यकाळातील 65 हजार कोटी रुपयांच्या खर्चाबाबतचे उपयोगिता प्रमाणपत्र अद्याप सादर केलेले नसल्याने त्यात घोटाळा झालाच असावा, असे आज तरी स्पष्ट होत असल्याचे खडसेंनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया देताना एकनाथ खडसे

एकनाथ खडसे आज (रविवारी) मुक्ताईनगरात आपल्या निवासस्थानी माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. यावेळी खडसेंनी उद्धव ठाकरे सरकारने केलेली कर्जमाफी, पक्षांतराची चर्चा अशा विषयांवरही भूमिका मांडली. खडसे पुढे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस सरकारने आपल्या कार्यकाळातील 65 हजार कोटी रुपयांच्या खर्चाबाबतचे उपयोगिता प्रमाणपत्र सादर केलेले नसल्याने कॅगच्या लेखापरीक्षकांनी गैरव्यवहाराचा ठपका ठेवला आहे. याच मुद्यावरून सध्या रणकंदन माजले आहे. मात्र, कॅगचे परीक्षण ही दरवर्षी निरंतर होणारी प्रक्रिया आहे.

हा विषय काही फक्त फडणवीस सरकारपुरता मर्यादित नाही. काँग्रेसच्या काळातही असे प्राथमिक अहवाल आले आहेत. सरकारने केलेल्या खर्चाबाबत उपयोगिता प्रमाणपत्र सादर करावी लागतात. जर फडणवीस सरकारने 65 हजार कोटी रुपयांच्या खर्चाची उपयोगिता प्रमाणपत्रे सादर केली तर त्यात गैरव्यवहार झाल्याचे म्हणता येणार नाही. मात्र, आजमितीला त्यांनी ही प्रमाणपत्रे सादर केलेली नसल्याने लेखापरीक्षकांनी ठपका ठेवला आहे. त्यामुळे 65 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला असावा, अशी शक्यता नाकारता येत नाही, असे मत खडसेंनी मांडले.

कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांना दिलासा-
विद्यमान उद्धव ठाकरे सरकारने शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीची घोषणा केली आहे. या कर्जमाफीचे निकष अद्याप स्पष्ट केलेले नसले तरी शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे, असे म्हणता येईल. गेल्या सरकारने केलेली कर्जमाफी आता 2 लाख रुपयांपुढे कर्ज असलेल्या शेतकऱ्यांच्या बाबतीत काय निकष असतील, हे माहिती नसल्याने कर्जमाफीच्या मुद्द्यावर अधिक बोलणे संयुक्तिक होणार नाही, असे खडसे म्हणाले.

पक्षांतराच्या विषयावर घुमजाव-

आपल्याला त्रास देणाऱ्यांवर कारवाई केली नाही तर आपण लवकरच पक्षांतर करू, अशी भूमिका खडसेंनी 2 दिवसांपूर्वी जाहीर केली होती. मात्र, आज त्यांनी पक्षांतराच्या विषयावर घुमजाव केले. माझ्या पक्षांतर करण्याच्या बातम्या चुकीच्या असून आपला तसा निर्णय झाला नसल्याचे सांगत त्यांनी याबाबत सविस्तर बोलण्यास नकार दिला.

ABOUT THE AUTHOR

...view details