जळगाव- माझा गुन्हा काय आहे, हे तरी पक्षाने सांगावे. मी खरच गुन्हेगार असेल, तर पक्ष देईल ती शिक्षा भोगायला तयार आहे. मात्र, असा अन्याय व्हायला नको. येत्या 2 दिवसात काय घडते ते पाहू. तिकीट मिळाले नाही तर मला साथ द्याल का? अशा शब्दांत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली.
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मुक्ताईनगरात आयोजित जाहीर सभेत एकनाथ खडसे बोलत होते. दरम्यान भाजपच्या पहिल्या यादीमध्ये नाव नसतानाही एकनाथ खडसे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पक्षाच्या पुढच्या यादीत आपले नाव येऊ शकेल. मात्र, मुहूर्त असल्याने आपण हा अर्ज दाखल करत आहोत असे सांगतानाच पक्षनिष्ठा हा गुन्हा असेल तर तो मी केला आहे, असेही एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - पहिल्या यादीत डावलल्याने खडसे समर्थक आक्रमक; घरासमोर ठिय्या
या मेळाव्यात खडसेंनी पुन्हा एकदा पक्षावर निशाणा साधला. ते पुढे म्हणाले, दिवंगत गोपीनाथ मुंडे माझे ज्येष्ठ सहकारी होते. पूर्वी उमेदवारी जाहीर करण्यासह पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत मी असायचो. पण, आता या प्रक्रियेपासून मी दूर आहे. पक्षाच्या निर्णयानुसार गेल्यावेळी सेनेसोबत युती तोडण्याची घोषणा देखील मी केली होती. मात्र, आता मला डावलले जात आहे. उभे आयुष्य मी पक्षासाठी खर्ची घातले. पण, आज माझा काय गुन्हा आहे, हे पक्षाने सांगावे, असे खडसे म्हणाले.