महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भाजपच्या पक्षांतर्गत खेळीमुळे वाढली एकनाथ खडसेंची अस्वस्थता - muktainagar Assembly Constituency

मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून सातत्याने सहा वेळा निवडून आलेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांना आज पक्षश्रेष्ठींनी जोरदार धक्का दिला. भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या १२५ उमेदवारांच्या यादीत खडसेंच्या नावाचा समावेश नसल्याने खडसे कमालीचे अस्वस्थ झाले आहेत.

एकनाथ खडसे

By

Published : Oct 2, 2019, 7:56 AM IST

Updated : Oct 2, 2019, 1:58 PM IST

जळगाव- विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपली पहिली यादी जाहीर केली आहे. मात्र, या यादीत भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचे नाव नसल्याने जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, शिवसेनेने या मतदारसंघावर दावा केला असून तशी मागणीही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. त्यामुळे खडसेंची अस्वस्थता वाढली आहे. भाजपच्या पक्षांतर्गत खेळीमुळे जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे.

भाजपच्या पक्षांतर्गत खेळीमुळे वाढली एकनाथ खडसेंची अस्वस्थता

मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून सातत्याने सहा वेळा निवडून आलेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांना आज पक्षश्रेष्ठींनी जोरदार धक्का दिला. भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या १२५ उमेदवारांच्या यादीत खडसेंच्या नावाचा समावेश नसल्याने खडसे कमालीचे अस्वस्थ झाले आहेत. ४० वर्षे प्रामाणिकपणे काम केले. हाच का आपला गुन्हा? या शब्दात खडसेंनी याबाबतची नाराजी माध्यमांसमोर बोलून दाखविली आहे. आपल्याला दुसऱ्या यादीची प्रतीक्षा असून याबाबत आपण पक्षश्रेष्ठींना जाब विचारू, असे खडसे यावेळी म्हणाले.

नामनिर्देशन अर्ज भरताना राज्य पातळीवरच्या नेत्यांची गैरहजेरी

दरम्यान, एकनाथ खडसे नामनिर्देशन अर्ज भरत असताना एकही राज्य पातळीवरचा नेता मुक्ताईनगरला फिरकला नाही. शिवाय भाजपशी युती झाली आहे, असे म्हणणारे मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे पदाधिकारीदेखील खडसेंपासून चार हात लांब राहिले. तिकडे शेजारी रावेर विधानसभा मतदारसंघात भाजप आमदार हरिभाऊ जावळे यांचा एबी फॉर्मसह उमेदवारी अर्ज भरताना मात्र, जलसंपदामंत्री गिरीश महाजन उपस्थित होते.

हेही वाचा-भाजपमध्ये बंडखोरी? यादीत नाव नसतानाही एकनाथ खडसेंचा उमेदवारी अर्ज दाखल

त्याचप्रमाणे शिवसेनेचे पदाधिकारीही तिकडे उपस्थित होते. दरम्यान, ज्यांची उमेदवारी जाहीर झाली त्यांचे अर्ज भरल्याचे गिरीश महाजन यावेळी म्हणाले. हीच प्रतिक्रिया सेनेच्या नेत्यांनी देखील दिली आहे. दरम्यान, मुक्ताईनगर मतदारसंघावर शिवसेनेने दावा ठोकला असून ही जागा पदरात पाडून घेण्याचे सेनेचे मनसुबे आहेत. हे एकप्रकारे एकनाथ खडसेंना शह देण्याचे संकेत आहेत.

हेही वाचा-एकनाथ खडसेंनी एबी फॉर्म नसतानाही भरला उमेदवारी अर्ज? 'हे' आहे कारण

मुक्ताईनगर मतदारसंघ भाजपकडेच कायम राहतो की, शिवसेनेला जातो? खडसेंची उमेदवारी रोखून धरण्यामागे पक्षाची कोणती रणनीती आहे? खडसेंचा पत्ता कापला तर कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर खडसेंची पुढची राजकीय भूमिका कोणत्या पक्षासोबत जाण्याची राहील? अशा विविध प्रश्नांवरून मुक्ताईनगरसह उत्तर महाराष्ट्रातील राजकारण मात्र चांगलेच ढवळून निघणार आहे.

Last Updated : Oct 2, 2019, 1:58 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details