जळगाव -भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजीमंत्री एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. नेमक्या याच पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे बोरखेडा हत्याकांडाच्या अनुषंगाने जळगाव जिल्हा दौऱ्यावर होते. या दौऱ्यात एकनाथ खडसे यांनी रावेरच्या विश्रामगृहात अनिल देशमुख यांची भेट घेवून गुप्तगू केल्याने राजकीय गोटात खळबळ उडाली. विशेष म्हणजे, रावेर येथून बोरखेडा येथे घटनास्थळापर्यंत अनिल देशमुख यांच्यासोबत खडसे एकाच वाहनातून गेल्याने त्यांच्यात राष्ट्रवादी प्रवेशाबाबत राजकीय चर्चा झाल्याचे देखील बोलले जात आहे.
भाजपकडून सातत्याने अन्याय होत असल्याने एकनाथ खडसे हे पक्षांतराच्या निर्णयापर्यंत आले आहेत. टोकाची भूमिका घेऊनही भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी खडसेंच्या बाबतीत ठोस भूमिका न घेता त्यांना बेदखल केले. यामुळे खडसे प्रचंड नाराज आहेत. घटस्थापनेच्या मुहुर्तावर खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करतील, अशी राजकीय गोटात अटकळ होती. मात्र, हा मुहूर्त हुकला आहे. खडसेंच्या पक्षांतराची चर्चा सुरू असतानाच रावेर तालुक्यातील बोरखेडा येथे चार अल्पवयीन भावंडांचे हत्याकांड झाल्याने खळबळ उडाली होती. बोरखेडा येथे भेट देण्यासाठी शनिवारी (दि. 17 ऑक्टोबर) राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख रावेर येथे आले होते. यावेळी विश्रामगृहात देशमुख व खडसे यांच्यात काही मिनिटे गुप्तगू झाली. त्यानंतर देशमुख यांच्याच वाहनातून खडसे देखील बोरखेडा येथील घटनास्थळी गेले. विश्रामगृहातील चर्चा व एकाच वाहनातून या दोन नेत्यांचा प्रवास पाहून उपस्थितींच्या भुवया उंचावल्या होत्या. दोन्ही नेत्यांमध्ये एकनाथ खडसे यांच्या संभाव्य राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.