जळगाव- येत्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजप व शिवसेना युतीची लवकरच घोषणा होणार असून, युतीच्या २२० जागा येणार असल्याचे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी सांगितले.
युतीला जनतेचे देखील मोठ्या प्रमाणात समर्थन मिळत आहे. त्यामुळेच विरोधक अजूनही चाचपडत असल्याचे ते म्हणाले. विरोधकांचा निर्णय झाला असला, तरीही त्यांना युतीला टक्कर देणे आता शक्य होणार नाही, असा ठाम विश्वास एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांनी 'ई टीव्ही भारत' ला मुलाखत दिली. यावेळी, 'यंदा युतीची सत्ता येणार असल्याचा विश्वास मलाच नाही; तर आमच्या विरोधकांनाही वाटत आहे', असे ते म्हणाले. त्यामुळे विरोधी पक्षात राहून चांगले पद मिळेल किंवा नाही, याची शंका असणारे नेते आमच्या पक्षात येत असल्याचे खडसे यांनी सांगितले. केंद्रापाठोपाठ राज्यातही पुन्हा भाजपची सत्ता येणार असल्याने विरोधी पक्षात राहण्यापेक्षा सत्ताधारी पक्षात गेलेले चांगले, अशी भावना पक्षातील मेगा भरतीबाबत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.