जळगाव- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्यामुळे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव त्यांच्या कोथळी गावात होऊ नये, यासाठी स्वतः ट्रॅक्टर चालवत निर्जंतुकीकरणासाठी फवारणी केली. कोरोनाबाबत ग्रामस्थांनी विशेष दक्षता घ्यावी, घराच्या बाहेर पडू नये, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
स्वत: ट्रॅक्टर चालवत एकनाथ खडसेंनी केली गावात फवारणी... हेही वाचा-लढा कोरोनाविरुद्धचा : हिमाचल सरकार राज्यातील प्रत्येक नागरिकाची कोरोना चाचणी करणार
जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी ग्रामपंचायतच्या ट्रॅक्टरवरून फवारणी करताना माजी मंत्री एकनाथ खडसे ट्रॅक्टर चालवत होते. विशेष म्हणजे, संपूर्ण गावात त्यांनी एक पूर्ण फेरी मारून फवारणी केली. दरम्यान, एकनाथ खडसे यांनी सामाजिक बांधिलकी जपत लॉकडाऊनमुळे प्रभावित झालेले हातमजूर, कामगार, गोरगरिबांसाठी अन्नछत्र उभारले आहेत. याप्रसंगी जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर, कोथळीचे पोलीस पाटील संजय चौधरी, ग्रामसेवक रोकडे आप्पा, वैद्यकीय विभागाचे कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.
दरम्यान, देशातील 32 राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांनी 31 मार्चपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केले होते. मात्र, हा आदेश झुगारुन लोक रस्त्यावर गर्दी करत आहेत. आवश्यकता भासल्याने संचारबंदी लागू करण्याचे निर्देश केंद्राने दिले होते. त्यानंतर 24 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांसाठी अखेर देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्याचा आज सातवा दिवस आहे.