महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 25, 2020, 3:04 PM IST

ETV Bharat / state

'भाजपमध्ये राहिलो असतो तर माझा आडवाणी, वाजपेयी केला असता'

एकनाथ खडसे यांनी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर ते आज जळगावला परत आले. त्यांनी आज आपल्या समर्थकांशी संवाद साधत यापुढेही पाठिंबा देण्याचे आवाहन केले.

Eknath Khadse
एकनाथ खडसे

जळगाव -भाजपविषयी आजही माझ्या मनात नितांत आदर आहे. परंतु, भाजपात असताना देवेंद्र फडणवीसांसारख्या प्रवृत्तींनी माझ्यावर अन्याय केला. भाजपातच राहिलो असतो तर मी राजकीय विजनवासात गेलो असतो. जे अडवाणी आणि अटलजींच्या बाबतीत झाले, तेच माझ्या बाबतीत झाले असते, म्हणून मी पक्षांतराचा निर्णय घेतला. शरद पवारांनी मला राष्ट्रवादीत प्रवेश देऊन माझे राजकीय पुनर्वसन केले. मी त्यांचे आभार मानतो, अशा शब्दात एकनाथ खडसे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

एकनाथ खडसे यांनी आज जळगामधील कार्यकर्त्यांशी संवाद साधला

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर खडसे आज दुपारी त्यांच्या मुक्ताईनगर येथील फार्महाऊसवर दाखल झाले. त्याठिकाणी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. फार्महाऊसवर येण्यापूर्वी खडसे त्यांच्या मूळगावी कोथळी येथे गेले. तेथे भाजपा खासदार रक्षा खडसेंनी त्यांचे औक्षण केले. कोथळी येथून फार्महाऊसवर आल्यानंतर खडसेंनी कार्यकर्त्यांना संबोधित केले.

दसरा हा आनंदाचा सण आहे. या शुभ मुहूर्तावर आपण भाजपा सोडून राष्ट्रवादीत दाखल झालो. भाजपात आपल्याला अपमानाची वागणूक मिळाली. तेव्हा कार्यकर्ते चिडायचे, संताप व्यक्त करायचे. गेली चार वर्षे मी हा अन्याय सहन केला. माझे मंत्रिपद का काढले? हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. मला बाजूला सारल्याने माझ्या मतदारसंघाचा विकासही थांबला, असे खडसे म्हणाले.

विधानसभा निवडणुकीच्या काळात मला तिकीट नाकारून कन्या रोहिणीला तिकीट दिले. मात्र, भाजपाच्याच काही लोकांनी रोहिणीच्या विरोधात काम करून त्यांना पाडले. याचे पुरावे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना दिले होते. तरीही त्यांनी कुणावर कारवाई केली नाही. या साऱ्या घडामोडींमुळे अनेक कार्यकर्ते नाराज होते. भाजपाने तिकीट नाकारले तेव्हा राष्ट्रवादीने माझ्यासाठी एबी फॉर्म आणला होता. तेव्हाच जर मी राष्ट्रवादीकडून उमेदवार म्हणून उभा राहिलो असतो, तर निवडून आलो असतो व मंत्रीही झालो असतो. भाजपातील काही लोकांनी रोहिणी आणि माझ्यात भांडण लावले. त्यानंतर सोशल मीडियावर कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. पक्षांतर का करत नाही? म्हणून माझ्यावर कार्यकर्त्यांचा दबाव होता. या सर्व घडामोडींमुळे मी पक्षांतराचा निर्णय घेतला, असे खडसेंनी सांगितले.

फडणवीसांनी अहंपणा दाखवला -

भाजपात असताना मी कधीही एकमताने निर्णय घेतले नाही. सर्वानुमते निर्णय घेतले. देवेंद्र फडणवीसांनी मात्र, मी म्हणेल ती पूर्व दिशा, अशा पद्धतीने अहंपणा दाखवला. आता शरद पवारांमुळे माझे राजकीय पुनर्वसन झाले आहे. मला कार्यकर्त्यांचे आजवर खूप सहकार्य मिळाले. येथून पुढे मला विकासाच्या दृष्टीने पुढे जायचे आहे. पुढच्या वाटचालीत देखील मला कार्यकर्त्यांचे असेच सहकार्य हवे आहे, असे आवाहन खडसेंनी केले.

फडणवीस-महाजन यांच्या मैत्रीला शुभेच्छा -

भाजपाकडून अन्याय होत असल्याने अनेक महिन्यांपासून कार्यकर्त्यांचा माझ्यावर पक्ष सोडावा म्हणून दबाव होता. हा दबाव वाढत होता. अशा स्थितीत विकासाच्या अपेक्षेने कार्यकर्ते पक्षांतराच्या बाजूने होते. देवेंद्र फडणवीसांनी माझ्यावर अन्याय केला, ही माझी भावना आहे. मी ती अनेकदा बोलूनही दाखवली आहे. गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात मैत्री आहे. त्यांच्या मैत्रीला मी शुभेच्छा देतो, असा चिमटाही खडसेंनी यावेळी काढला.

ABOUT THE AUTHOR

...view details