धुळे - ज्या खान्देशात भाजपा रुजवली आणि वाढवली त्याच खान्देशातून भाजपाला हद्दपार करू, असे नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले एकनाथ खडसे म्हणाले. धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे एका सभेत खडसे कार्यकर्त्यांना संबोधित करत होते.
प्रतिकूल परिस्थितीत भारतीय जनता पक्षाचा झेंडा हाती घेऊन खान्देशात कमळ फुलवले. मात्र तथ्यहीन कारणे पुढे करून मला संपविण्याचा कुटील डाव भाजपातील नेत्यांनी केला. अजून किती सहन करावे यामुळेच मी भाजपाला राम-राम ठोकल्याचे खडसे म्हणाले. तसेच उत्तर महाराष्ट्राच्या अपूर्ण राहिलेल्या योजना पूर्ण करण्यासाठी राष्ट्रवादीची वाट धरल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भाजपा विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात रान उठवू
खडसे म्हणाले, महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडा असे सर्व भागातील मुख्यमंत्री झालेत. परंतु नेहमी उत्तर महाराष्ट्राला दुय्यम स्थान मिळाले. जेव्हा उत्तर महाराष्ट्राला संधी मिळणार, असे वाटले. तेव्हाच माझ्यावर चुकीचे आरोप करून बाजूला केले. हे एक षड्यंत्र होते. परंतु यापुढे अन्याय सहन करणार नाही. तर भाजपा विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात रान उठवून राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करू आणि विकास साधू. आगामी काळात भाजपातील नेत्यांना कळेल, की नाथाभाऊ काय होते.
...त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते दुरावतील
मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असणारे खूप लोक भाजपा सोडुन गेले. मात्र त्यामुळे काही फरक पडत नाही. अशी प्रतिक्रिया जळगाव जिल्ह्याचे नेते गिरीश महाजन यांनी दिली होती. यावर बोलताना खडसे म्हणाले, भाजपचे नेते जी गर्विष्ठ भाषा वापरतात त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते दुरावतील. त्यांना आगामी काळात कळेल की भाजपचे काय नुकसान झाले.
अनिल गोटे यांचे खळबळजनक वक्तव्य
दरम्यान, धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी खळबळजनक वक्तव्य केले. ते म्हणाले, डिसेंबरपर्यंत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भ्रष्टाचाराचे एक प्रकरण बाहेर काढत आहोत. याबाबत लवकरच माहिती देऊ.
हेही वाचा-दोन राजांमध्ये दिलजमाई : रामराजे आणि उदयनराजे यांची बंद खोलीत चर्चा
हेही वाचा-'केंद्राचे धोरण शेतकऱ्याला उद्धवस्त करणारे'