जळगाव- मी पक्षावर नाराज नाही. मात्र, पक्षांतर्गत कुरघोड्यांबाबत माझ्याकडे अनेक पुरावे आहेत. पक्षाने मला परवानगी दिली तर पत्रकार परिषद घेऊन, मी ते पुरावे सर्वांसमक्ष जाहीर करेन, असा धक्कादायक गौप्यस्फोट आज भाजप नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे.
भाजपची उत्तर महाराष्ट्र कोअर कमिटीची बैठक आज जळगावात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत होत आहे. या बैठकीला उपस्थित राहिल्यानंतर खडसे माध्यमांशी बोलत होते.
हेही वाचा - 'राज्याच्या विकासाचा वेग मंदावणे सरकारला परवडणारे नाही'
खडसेंचे बैठकीस्थानी आगमन झाल्यानंतर पत्रकारांनी आपण उशिरा का आलात? याबाबत विचारणा केली. त्यावर उत्तर देताना खडसे म्हणाले की, मला बैठकीचा साडेतीन वाजताचा निरोप होता. त्यानुसार मी वेळेवर हजर झालो आहे. राहिला विषय नाराजीचा तर मी पक्षावर नाराज नाही. मात्र, गिरीश महाजन यांनी मला जर काही पुरावे असतील तर ते जाहीर करण्याचे आव्हान केले आहे. माझ्याकडे पुरावे असून मी ते आधीच पक्षश्रेष्ठींकडे दिले आहेत. आज बैठकीत मला प्रदेशाध्यक्षांनी परवानगी दिली तर मी बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन ते सर्वांसमक्ष जाहीर करेन, असेही खडसे म्हणाले.
हेही वाचा - भाजपच्या उत्तर महाराष्ट्र कोअर कमिटीच्या बैठकीला एकनाथ खडसेंची दांडी?
पक्षाच्या निर्णयाविरोधात मी जाणार नाही, असेही खडसे शेवटी म्हणाले. दरम्यान, गिरीश महाजन यांनी केलेल्या आव्हानासंदर्भात सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या प्रतिक्रियांचे 'प्रिंट आऊट' काढून त्यांचे एक पुस्तक खडसेंनी बैठकीत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना दिले. या प्रकाराची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.