जळगाव- भाजपामधील ६० टक्के लोक हे बाहेरून आलेले आहेत. मग त्यांनाही चॉकलेट किंवा कॅडबरी देऊनच पक्षात आणले आहे का? अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. चॉकलेट आणि कॅडबरी हा चंद्रकांत पाटील यांचाच अनुभव आहे, असा चिमटा देखील खडसेंनी यावेळी काढला.
एकनाथ खडसे आज दुपारी मुक्ताईनगर येथून जळगावात त्यांच्या निवासस्थानी आले होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर पत्रकारांशी संवाद साधला. खडसेंनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसचा पर्याय निवडल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्यावर टीका करताना 'राष्ट्रवादीने एकनाथ खडसे यांना चॉकलेट दिले की कॅडबरी?' असे वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याचा समाचार घेताना खडसे म्हणाले की, भाजपात ६० टक्के लोक बाहेरचे आहेत. मग त्यांनाही चॉकलेट देऊन आणले आहे का? चंद्रकांत पाटलांच्या म्हणण्यानुसार, काल दसऱ्याच्या निमित्ताने मला भेटण्यासाठी आलेल्या प्रत्येकाला मी चॉकलेट आणि कॅडबरी दिली, अशा तिरकस शब्दात खडसेंनी चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.
चार-पाच दिवस थांबा
यावेळी पत्रकारांनी खडसेंना राष्ट्रवादीतील त्यांच्या पुढील भूमिकेबाबत विचारणा केली असता, अजून चार-पाच दिवस थांबा, असे सांगत खडसेंनी लवकरच मोठे गौप्यस्फोट करण्याचे संकेत दिले.
नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा येथील माजी आमदार उदेसिंग पाडवी यांच्यासोबत झालेल्या बंदद्वार बैठकीबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, नंदुरबार जिल्ह्यात दुसऱ्या पक्षातील अनेक नेतेमंडळी व कार्यकर्ते राष्ट्रवादीत येण्यास उत्सुक आहेत. याबाबत आज आमची चर्चा झाली. राष्ट्रवादीत येण्यास इच्छुक असणाऱ्या लोकांची यादी तयार करावी. नंतर त्या ठिकाणी एक जाहीर मेळावा घेऊन सर्वांना प्रवेश द्यावा, असे बैठकीत ठरले. शिवाय काही नगरपालिका निवडणुकीबाबत प्राथमिक चर्चा झाल्याचे खडसेंनी सांगितले.